Shambhuraj Desai : चर्चा होती मग कुठे कांडी फिरली? शंभूराज देसाईंचा ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरुन सवाल
‘सत्तास्थापनेला शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू असं शिवसेना पक्षप्रमुख म्हटले. त्यानंतर तशी चर्चा देखील होती, मग शेवटच्या दोन दिवसात अशी कुठे कांडी फिरली,’ असा सवाल शंभूराज देसाईंनी केला आहे.
मुंबई : आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसिद्ध झाला. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. आज मुलाखतीचा दुसरा भाग प्रसिद्ध झाला आणि टीकाही सुरू झाल्या आहेत. यावरुन शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. ‘सत्तास्थापनेला शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू असं शिवसेना पक्षप्रमुख म्हटले होते. त्यानंतर एक-दोन दिवस तशी चर्चा देखील होती, मग शेवटच्या दोन दिवसात अशी कुठे कांडी फिरली,’ असा सवाल शंभूराज देसाई यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे. मुलाखतीचा काल पहिला आणि आज दुसरा भाग प्रसारित झाला. कालच्या पहिल्या भागात उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला पालापाचोळा असं म्हटलं. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडून जोरदार टीका करण्यात आली होती. आमदार संजय शिरसाट यांनी काल मुलाखतीच्या पहिल्या भागावरुन टीकास्त्र सोडलं. यावेळी त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते.