रोहित पवारांचा विधानसभेच्या तोंडावर मोठा दावा, ‘महायुती एका मतदारसंघात 30-40 कोटी रूपये…’
विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या लोकांनी कितीही पैसा ओतला तरी महाराष्ट्रातील स्वाभिमानी लोकं हे महाविकास आघाडी सोबत राहतील. तर महाविकास आघाडीच्या कमीत कमी १८० जागा विधानसभेला निवडून येतील असा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केलात.
पुण्यात खेड-शिवापूर परिसरात एका गाडीतून जवळपास ५ कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली. ही गाडी सत्ताधारी आमदार शहाजीबापू पाटील यांची असल्याचा आरोप विरोधकांकडून होतोय. अशातच ५ कोटी त्यांचेच होते हे शहाजी बापूंनी स्विकारलं का? असा सवाल रोहित पवार यांनी केलाय. तर एफआयरमध्ये शहाजी बापूंच्या कार्यकर्त्यांची नाव असल्याचेही रोहित पवार यांनी म्हटलंय. ‘सहा ते सात गाड्या होत्या. त्यात पाच कोटी रूपये सापडले असे म्हणतात. पण त्यात २५ ते ३० कोटी रूपये होते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी झाडं अन् डोंगर बघण्यासाठी जे आमदार गेले होते. भाजप असेल अजित पवार यांचा पक्ष, महायुती असेल हे एका मतदारसंघात ३० ते ४० कोटी रूपये खर्च करणार आहे.’ असा दावाच रोहित पवार यांनी केला. पुढे ते असेही म्हणाले, महायुतीचा जनतेवर विश्वास राहिलेला नाही. त्यांना असं वाटतं पैसा ओतला की स्वाभिमानी लोकांना विकत घेता येतं पण गेल्या लोकसभा निवडणुकीला जनतेने, महाराष्ट्रातील स्वाभिमानी लोकांनी दाखवून दिलं आहे की निष्ठा, विचार हे महत्त्वाचे असतात, असे रोहित पवार म्हणाले.