वेदांता प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणं हे दुर्देव; शरद पवारांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल
दोघे मंत्री असलेल्या मंत्रिमंडळात असताना त्या मंत्रिमंडळावर टीका करतात हे काही शहाणपणाचं लक्षण नाही, अशी टीकाही शरद पवार यांनी केली. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन वेदांता प्रकल्पाबाबतची आपली भूमिका मांडली.
पुणे: वेदांता प्रकल्प (vedanta project) गुजरातला गेल्याने काही लोकांनी सांगितलं हा निर्णय बदलायला हवा. हा प्रकल्प महाराष्ट्रात आणला पाहिजे अशी मागणी होत आहे. पण ते काही होणार नाही. महाराष्ट्रातील हा प्रकल्प बाहेर जायला नको होता. पण तो गेला. तो गेल्यानंतर त्यावर आता चर्चा करण्यात अर्थ नाही, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) म्हणाले. या प्रकल्पाच्या अनुषंगाने दोन गोष्टी लक्षात आल्या आहेत. मागच्या सरकारने निर्णय घेतला नाही. त्याला उद्धव ठाकरे यांचं सरकारच हा प्रकल्प गुजरातला जाण्यास जबाबदार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलं. उद्धव ठाकरेंच्या (uddhav thackeray) मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे आणि उदय सामंत मंत्री होते. दोघे मंत्री असलेल्या मंत्रिमंडळात असताना त्या मंत्रिमंडळावर टीका करतात हे काही शहाणपणाचं लक्षण नाही, अशी टीकाही शरद पवार यांनी केली. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन वेदांता प्रकल्पाबाबतची आपली भूमिका मांडली.