Sharad Pawar Resigns | ‘वस्ताद, कधीही कुस्ती सोडत नाही तर…’, पुणे, नवी मुंबईनंतर आता कुठे झळकले शरद पवार यांचे बॅनर
VIDEO | राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा, ही विनंती करणारे बॅनर्स, बॅनरवरील 'त्या' आशयाने वेधले सर्वांचेच लक्ष
भंडारा : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सगळ्यांमध्येच अस्वस्थता निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र शरद पवार हे केवळ राष्ट्रवादी पुरतेच मर्यादित नसून सर्वपक्षीय नेत्यांच्या आदरस्थानी आहेत. अशातच पुणे, नवी मुंबई पाठोपाठ पूर्व विदर्भात भंडाऱ्यात देखील शरद पवार यांनी आपला राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा, यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पवारांना विनंती करणारे बॅनर्स झळकावल्याचे पाहायला मिळत आहे. भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा गड मानल्या जाणाऱ्या तुमसर शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून शरद पवारांसंबधित बॅनरबाजी करण्यात करण्यात आली आहे. या बॅनरवर ‘वस्ताद.. कधीही कुस्ती सोडत नसतो, तो आणखी नव्या जोमाने पैलवानांची भावी पिढी घडवत असतो. साहेब, तुम्ही आमच्या पाठिशी होता, आहात आणि कायम राहाल…साहेब,आपला निर्णय मागे घ्या…’, असा आशय लिहिला आहे. बॅनरवर लिहिलेला हा भावनिक आशय सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.