‘गुवाहाटीला जाणारच, रेल्वेने नाहीतर…’; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेवर शहाजीबापूंचं सडतोड प्रत्युत्तर

| Updated on: Nov 11, 2024 | 1:56 PM

सांगोल्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार दीपक आबा साळुंखे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. या प्रचारसभेत बोलत असताना त्यांनी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर निशाणा साधला. यालाच शहाजीबापू पाटील यांनी पलटवार केलाय.

उद्धव ठाकरेंनी सांगोल्यात घेतलेल्या सभेत शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर टीकास्त्र डागलं. ‘रेल्वेमध्ये कोणाची ओळख आहे का? एक तिकीट पाहिजे. 23 तारखेंचं एक तिकीट पाहिजे. ते सुद्धा गुवाहाटीचं. त्यांना परत जाऊद्या. काय झाडी, काय डोंगर त्यांना तिकडेच झाडं मोजत बसूद्या’, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शहाजी बापू पाटील यांच्यावर हल्लाबोल चढवला होता. दरम्यान, यावर शहाजीबापू पाटील यांनी पलटवार केलाय. ‘उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री पद गेल्यापासून सत्ताधाऱ्यांना शिव्या देण्यापलीकडे ते कोणताही अजेंडा जनते समोर मांडत नाहीत, असं म्हणत शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. पुढे ते म्हणाले, मला गुवाहाटीला जाण्याचं तिकीट त्यांनी काढून द्यायचं ठरवलं आहे. परंतु मी रेल्वेने न जाता विमानाने विजयाचा गुलाल अंगावर घेऊन गुवाहाटीला जाणार आहे. गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचे दर्शन घेणार आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रार्थना करणार आहे’, असे शहाजीबापू पाटील म्हणालेत.

Published on: Nov 11, 2024 01:56 PM