Shiv Sena Dasara Melava : उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? शिवाजी पार्कवर कोणाची तोफ धडाडणार?
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा बीकेसी किंवा आझाद मैदान येथे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेकडून दोन्ही मैदानाचे दसऱ्याच्या दिवशी आरक्षण करण्यात आले आहे. तर दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाची मागणी केली नसल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होतायत. शिवसेनेची दसरा मेळावा ही परंपरा आहे. दसरा मेळाव्याच्या दिवशी होणाऱ्या भाषणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असते. गेल्या वर्षी शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर झाला होता. तर मुंबईतील आझाद मैदानावर शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला होता. मात्र यंदा शिवाजी पार्कवर कोणाचा दसरा मेळावा होणार? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असताना सूत्रांकडून मोठी माहिती समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा शिवाजी पार्कवर होणार असून ठाकरे गटाला या आठवड्यात परवानगी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यंदाच्या दसऱ्या मेळाव्याकरता एकनाथ शिंदे गटाने अर्ज न केल्याने याआधीच ठाकरे गटाचा मार्ग मोकळा झाला आहे. तर दसऱ्या मेळाव्यासाठी शिवाजी पार्क ठाकरे गटाकडे गेल्याने शिंदे गटाचा मेळावा बीकेसी किंवा आझाद मैदानावर होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या महत्त्वाच्या नेत्यांकडून बीकेसी आणि आझाद मैदान या दोन्ही मैदानाची पाहणी करण्यात येणार आहे. यानंतर एका मैदानाचं नाव निश्चित करून शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे.