ठाकरेंनी भेंडीबाजारमध्ये दसरा मेळावा घ्यावा, राऊतांच्या ‘त्या’ टीकेवरून कोणी लगावला खोचक टोला?
गेल्या वर्षी शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर झाला होता. तर मुंबईतील आझाद मैदानावर शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला होता. मात्र यंदा शिवाजी पार्कवर कोणाचा दसरा मेळावा होणार? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी गुजरातमध्ये दसरा मेळावा घ्यावा, असं ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी वक्तव्य केले होते. तर एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रात दसरा मेळावा घेण्याचा नैतिक अधिकार नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली होती. तर एकनाथ शिंदे यांनी अदानी यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवावं, अशी खोचक टीकाही संजय राऊत यांनी केली. तर संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. ठाकरे गटानं भेंडीबाजारमध्ये दसरा मेळावा घ्यावा, असा खोचक टोला संजय निरूपम यांनी लगावला आहे. पुढे ते असेही म्हणाले, ‘एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा मुंबईतच होईल. पण उबाठामध्ये जे सुरू आहे त्यावरून त्यांचा दसरा मेळावा यंदा भेंडीबाजारमध्ये व्हायला हवा. कारण त्यांच्याकडे जे समर्थक आहेत, नवीन शिवसैनिक आहेत, यासोबत जे नवीन मतदार आहेत ते फक्त मुस्लिम समाजाचे राहिले आहेत. त्यामुळे भेंडीबाजारमध्ये ठाकरे गटाचा दसरा मेळावा झाला तर तो यशस्वी होईल’, असा घणाघात संजय निरूपम यांनी केला.