छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणार? शिवसेनेच्या ‘या’ आमदारांची आक्रमक मागणी काय?
शिवसेनेच्या दोन आमदारांनी भुजबळांची मंत्रिमंडळातूनच हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसींसाठी घेतलेल्या भूमिकेवरून भुजबळांना मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याची आक्रमक मागणी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे.
मुंबई, ३१ जानेवारी २०२४ : मनोज जरांगे पाटील यांची सगेसोयरे याबाबतची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केली. मात्र सरकारच्या या भूमिकेवर मंत्री छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, सरकारच्या या अध्यादेशानंतर दुसऱ्या दिवशी भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली. त्यांच्या या भूमिकेमुळे सरकारमध्ये सारं काही अलबेल नसल्याचे समोर आले आहे. कारण शिवसेनेच्या दोन आमदारांनी भुजबळांची मंत्रिमंडळातूनच हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसींसाठी घेतलेल्या भूमिकेवरून भुजबळांना मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याची आक्रमक मागणी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे. तर मंत्रिमंडळात राहून छगन भुजबळांची मराठ्यांप्रती तिरस्काराची भूमिका असल्याचा आरोपही संजय गायकवाड यांनी केला. भुजबळांच्या ओबीसींबाबतच्या भूमिकेवरून संजय गायकवाड यांनी निशाणा लगावला आहे. तर राजकारण करणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडावं, असा हल्लाबोल शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केलाय.