अमित ठाकरेंसाठी माहिम मतदारसंघातून माघार नाही म्हणजे नाही असं ठरवलं असून ते स्टॅम्प पेपरवर लिहून देण्यास देखील तयार आहेत. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदा सरवणकर यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी शिंदेंनी सूचना केल्याची माहिती आहे. इतकंच नाहीतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सरवणकरांना विधानपरिषदेची ऑफर देण्यात आल्याचेही कळतंय. माहिम मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर, अमित ठाकरे आणि ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत असा तिहेरी सामना यंदा माहिममध्ये रंगणार आहे. मात्र सदा सरवणकरांनी माघार घेतल्यास माझाच फायदा असल्याचे ठाकरेंचे उमेदवार महेश सावंत म्हणाले. जे सावंत म्हणाले तेच दोन दिवसांपूर्वी फडणवीस म्हणालेत. सरवणकरांनी अर्ज मागे घेतल्यास ती मतं ठाकरेंच्या शिवसेनेला जातील, असं शिंदेंच्या शिवसेनेतील काही नेत्यांचं मत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यातच मुस्लिम मतंही बऱ्यापैकी आहेत. ती मतं ठाकरेंच्या शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरवणकरांचा अर्ज मागे घेणं म्हणजे त्याचा सावंतांना फायदा असल्याची चर्चा शिंदेंच्या गोटात सुरू आहे.