‘मविआ’तील सर्वात मोठी घडामोड, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात होणार भेट
VIDEO | महाविकास आघाडीत सध्या मतभेदांमुळे सारं काही आलबेल नसताना आता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडतेय
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट होणार आहे. उद्धव ठाकरे स्वत: शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी जाणार आहेत. या दोन्ही नेत्यांची रात्री आठ वाजता भेट होणार असल्याची माहिती मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री, उद्योगपती गौतम अदानी यांच्या जेपीसी चौकशीची मागणी आणि निवडणुकीत ईव्हीएम मशीनचा वापर यावरुन महाविकास आघाडीत मतभेद सुरु असून मोदींच्या डिग्रीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसने एक वेगळी भूमिका घेतली. मोदींच्या डिग्री विषयी चर्चा करण्याची गरज नाही, असं राष्ट्रवादीने म्हटलं. तर संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींची डिग्री खरी असली पाहिजे, असं ठाकरे गटाकडून सांगण्यात आलं होतं. अशातच ही भेट राजकीय होणार असून महाविकास आघाडीत अनेक मुद्द्यांवर एकमत नसल्याचे समोर येत आहे. पण आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव करायचा असेल तर एकत्र राहणं जास्त गरजेचं आहे. याच विचारावर दोन्ही बड्या नेत्यांमध्ये चर्चा होण्यची शक्यता आहे.