‘शिवतीर्थावर देवाची आळंदी, चोरांची आळंदी तर…’, संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा
मुंबईत शिवसेना पक्षांची दोन स्वतंत्र दसरा मेळावे आज होतायतं. उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा नेहमीप्रमाणे दादरच्या शिवाजी पार्क येथे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आझाद मैदानावर होतोय. दरम्यान, ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यातून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार भाषण करत एकनाथ शिंदे, भाजप, सरकार आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून जोरदार घणाघात केल्याचे पाहायला मिळाले.
‘विश्वासाचं दुसरं नाव ठाकरे आहे. विश्वास म्हणून समस्त जनता आणि हा महाराष्ट्र मोठ्या वादळातील संकटात देखील ठाकरेंच्या मागे उभा होता आणि पुढेही राहिल. शिवाजीपार्कवर जमलेली ही देवाची आळंदी आहे. चोरांची आळंदी तर आझाद मैदानावर भरलेली आहे’, असे म्हणत संजय राऊत यांनी शिंदेंच्या दसरा मेळाव्यावर खोचकपणे टीका केली आहे. पुढे राऊत असेही म्हणाले, ‘आदित्य ठाकरे तुम्ही दसरा मेळाव्यात पहिलं भाषण केलं. ही नव्या पर्वाची सुरुवात आहे. मुलाने वडिलांसमोर भाषण केले नाही ही परंपरा आहे. पण तुम्हाला सांगतो आता तुम्ही लहान मुलं नाही. तुम्ही राज्याचे आणि देशाचे नेते आहात. तुम्ही मगाशी लढणार का विचारलं, जेव्हा जेव्हा ठाकऱ्यांच्या तीन पिढ्यांनी आवाहन केलं लढणार का तेव्हा हा महाराष्ट्र फक्त ठाकऱ्यांच्याच मागे राहिला आहे. प्रबोधनकार ठाकरे असतील, बाळासाहेब ठाकरे असतील आणि उद्धव ठाकरे असतील. आता तुम्ही आवाहन केलं आहे. तुमच्या नेतृत्वात महाराष्ट्र लढायला तयार आहे. मशाल हे एनिमी ऑफ डार्क आहे. अंधार दूर करणारी ही मशाल आहे.’ हरियाणा निकालावर बोलताना राऊत म्हणाले, निकाल लागला हरियाणात आणि पेडे वाटताय फडणवीस. सकाळी १० पर्यंत काँग्रेस आघाडीला आहे. बारा वाजता भाजपने सरकार बनवलं. जो काँग्रेस पक्ष ७२ जागावर आघाडीवर होता. तो १२ वाजता कसा आघाडीवर येतो. फक्त ०.६ मतांमुळे भाजपला फायदा कसा झाला. हा ईव्हीएमचा घोटाळा असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. हरियाणात घडलं ते महाराष्ट्रात घडणार नाही, असा दावाही त्यांनी केला.