‘काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, हे राज्य कोणाच्या भरवशावर?’, ठाकरे गटाच्या महिला नेत्याचा निशाणा
देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये सर्वात आघाडीवर असताना अधिकृत घोषणा बाकी झाली नसल्याने ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा महायुती आणि शिवसेना शिंदे गटाला डिवचल्याचे पाहायला मिळत आहे.
महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही महायुतीकडून नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झालेली नाही. तर देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये सर्वात आघाडीवर असताना अधिकृत घोषणा बाकी झाली नसल्याने ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा महायुती आणि शिवसेना शिंदे गटाला डिवचल्याचे पाहायला मिळत आहे. विजयाची खात्री नसलेल्या शिंदे गटाच्या वाचाळ प्रवक्त्यानं म्हटलं होतं की जर 48 तासात सरकार स्थापन नाही झालं तर 26 नोव्हेंबरला राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते, मात्र त्या शिंदे गटातील सत्तेतील दावा संपला आहे. अशातच भाजप हा मोठा पक्ष ठरला असला तरी भाजपचा मुख्यमंत्री अद्याप ठरत नाहीये, असं म्हणत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी हल्लाबोल केलाय. दरम्यान, आता जर 5 डिसेंबरला शपथविधी होणार असेल तर एकीकडे काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. 5 तारखेपर्यंत हे राज्य कोणाच्या भरवशावर चालणार आहे, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे. सुषमा अंधारे यांनी पुढे बोलताना लाडकी बहीण योजनेवरून त्यांनी भाजपला देखील टोला लगावला आहे. त्या म्हणाल्या, लाडक्या बहिणींना सत्तेत वाटा मिळणार आहे की नाही? लाडक्या बहिणी १५०० रूपयांमध्ये आणि अख्खी तिजोरी लाडक्या भावाच्या हातात असं किती दिवस चालणार आहे? भारतीय जनता पार्टीमध्ये एकही महिला मुख्यमंत्रिपदासाठी योग्य नाही का? असा सवाल यावेळी सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.