Sanjay Raut | देशात लोकशाही राहिली नाही : संजय राऊत
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा देशासाठी फार मोठा त्याग आहे. प्रियांका त्यांची नात आहे. त्यांनी पीडितांची भेट घेणं गुन्हा आहे का?, असे एक ना अनेक सवाल विचारत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला झोडपून काढलं.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातल्या लखीमपूर खिरी इथल्या घटनेवरुन देशभरात संताप व्यक्त होत आहे. या घटनेत निरापधार लोकांचे बळी गेलेत. पंतप्रधान मोदी संवेदनशील आहेत. मग या घटनेवेळी त्यांची संवेदना कुठे गेली होती. कळस म्हणजे पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी निघालेल्या प्रियांका गांधींना उत्तर प्रदेश सरकार आणि पोलिसांनी अडवून धरलं. त्यांना स्थानबद्ध केलं. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा देशासाठी फार मोठा त्याग आहे. प्रियांका त्यांची नात आहे. त्यांनी पीडितांची भेट घेणं गुन्हा आहे का?, असे एक ना अनेक सवाल विचारत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला झोडपून काढलं. लखीमपूर खिरी इथं रविवारी शेतकऱ्यांसह 8 जणांना चिरडल्यानंतर देशभरात संतापाचा उद्रेक आहे. कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून चिरडण्यात आलं. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राने अंगावर गाडी घालण्याचा पराक्रम गाजवला असा शेतकऱ्यांचा दावा आहे. याचविषयी बोलताना संजय राऊत यांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला.