म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, शिंदे गटाच्या महिला आमदाराचं विरोधकांच्या टीकेवर प्रत्युत्तर
मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या यामिनी जाधव यांनी नुकतंच ‘टीव्ही 9 मराठी’शी Exclusive चर्चा केली. यावेळी त्यांनी बुरखा वाटप कार्यक्रमामुळे झालेल्या टीकेवर भाष्य केले. बघा विरोधकांच्या टीकेवर काय दिलं प्रत्युत्तर?
मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या यामिनी जाधव यांनी मुस्लिम महिलांना बुरखा वाटप केले. यावरुन आता विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. विरोधकांच्या टीकेवर स्वतः यामिनी जाधव यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “आम्ही मुस्लिम महिलांच्या सन्मानासाठी बुरखा वाटप केले, तर मग त्यात इतकं वावगं वाटण्यासारखं काय आहे?” असा सवालच त्यांनी विरोधकांना केलाय. पुढे त्या असेही म्हणाल्या, मी गेल्या अनेक वर्षांपासून मुस्लिम धर्मासाठी काम करत आहे. मुस्लिम धर्मातील महिलांना सर्वात जास्त काय प्रिय असेल तर तो बुरखा. हा त्यांचा एक सन्मान आहे. त्या दृष्टीने मी हे वाटप केलेलं आहे. माझ्या विधानसभेच्या मतदारसंघात सर्वधर्मीय लोक राहतात. या ठिकाणी सर्व धर्माची लोक राहतात. लोकप्रतिनिधीने त्याच्या विभागातील लोकांना काय हवं, ते कुठल्याही धर्माचे का असेना, त्यांचा पहिला विचार करणं गरजेचे असते. लोकप्रतिनिधीने बाहेर सतत वावरताना स्वत:चा धर्म सतत पुढे न करता, माझ्या लोकांना काय हवं हे पाहणं गरजेचे असते. दिवाळीच्या वेळी आपण घराघरात एखादी भेटवस्तू देत असतो. पण मुस्लिम भगिनींना आपण काहीही देत नाही, हा ते करण्यामागे एक हेतू होता, असे त्यांनी सांगितले.