घराणेशाही नष्ट करण्यासाठी ‘तो यतोय’, सिंधुदुर्गातील ‘त्या’ बॅनरची तुफान चर्चा
सिंधुदुर्गात निवडणुकीचे वेध लागले असून सध्या जिल्ह्यात ठिकठिकाणी बॅनर वॉर रंगल्याचे दिसून येत आहे. तो येतोय अशा आशयाचे लक्षवेधी बॅनर आज कणकवलीत ठिकठिकाणी लागले.
कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून काही नावे इच्छुकांच्या यादीत असताना आता या जागेसाठी हळूहळू रस्सीखेच होताना पाहायला मिळत आहे. एकीकडे भाजपाकडून नितेश राणे हे उमेदवार निश्चित असताना मात्र ठाकरे गटाचे उमेदवार कोण हे अद्याप अस्पष्ट आहे. त्यातच सर्वांकडूनच उमेदवारीसाठी मोर्चे बांधणी केली जात असताना काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक देखील झाली. या बैठकीत अंतिम निर्णय झाला नसला तरी काहींकडून लॉबिंग केलं गेल्याचीही चर्चा सुरू होती. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत चौका-चौकात “तो येतोय, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घराणेशाही नष्ट करण्यासाठी” कणकवली विधानसभा आणि त्याखाली मशाल चिन्ह अशा आशयाचे बॅनर लावले गेलेत. हा बॅनर ठाकरे गटाकडून लावला गेला असल्याचे प्रथमदर्शनी जरी दिसत असले तरी त्याची अधिकृत जबाबदारी अद्याप कुणीही घेतलेली नाही. पक्षांतर्गत कुरबुरीतून याचा रोख युवा सेना जिल्हाप्रमुख इच्छुक उमेदवार सुशांत नाईक यांच्यावर देखील असू शकतो, अशी चर्चा आहे. त्यामुळे या उलट सुलट चर्चामुळे हा बॅनर सध्या कणकवलीसह जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे अशा बॅनरच्या माध्यमातून “तो येतोय” तो येणारा नेमका कोण असणार ते लवकरच स्पष्ट होणार आहे. मात्र यामुळे ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर आल्याचे बोलले जात आहे.