Special Report | अजित पवारांच्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या पहाटेच्या शपथविधीवरुन टोलेबाजी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीच्या मुद्द्यावरून आज विधानसभेत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यात चांगलीच जुंपली.
मुंबई: मुस्लिम आरक्षण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीच्या मुद्द्यावरून आज विधानसभेत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यात चांगलीच जुंपली. तुम्ही अजितदादांचे विरोधक आहात का? झाली अजितदादांकडून चूक, असा चिमटाच सुधीर मुनगंटीवार यांनी नवाब मलिक यांना लगावला.
समाजवादी पार्टीचे आमदार अबु आझमी आणि रईस शेख यांनी सभागृहात बॅनर घेऊनच प्रवेश केला. मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देण्याबाबत त्या बॅनरवर लिहिलं होतं. यावेळी आझमी यांनी मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. मुस्लिम आरक्षणावर सभागृहात चर्चा का होत नाही? असा सवाल अबु आझमी यांनी केला. यावेळी काँग्रेसचे आमदार अमिन पटेल यांनीही मुस्लिम आरक्षणाची बाजू लावून धरली. नारायण राणे समितीने मुस्लिमांना आरक्षण देण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे मुस्लिमांना आरक्षण दिलंच पाहिजे, असं पटेल म्हणाले.