‘कुटुंबासाठी माझा ‘तो’ निर्णय चुकीचा, त्याला मी जबाबादार’; अजित पवारांकडून खंत व्यक्त
लोकसभेत झालेल्या पराभवावर अजित पवार यांनी मोठा खुलासा केला आहे. सुनेत्रा पवार यांना बारामतीमधून निवडणूक लढवायला सांगणं ही आपली चूक होती, असं अजित पवार म्हणाले. तर अजित पवार यांनी केलेल्या या वक्तव्यावर एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सविस्तर स्पष्टीकरण देखील दिले आहे.
बारामतीमधून पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणूक लढवायला सांगणं ही आपली चूक होती, असे म्हणत अजित पवारांनी पुन्हा कबुली दिली. अजित पवार यांनी आज एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत यावर सविस्तर भूमिका व्यक्त केली. ‘माझ्या मनात जे येतं ते मी बोलतो. मी ३५ वर्षापासून राजकारणात आहे. मला कुणी तरी विचारलं. मी निवडणुकीनंतर बराच विचार केला. हे कसं झालं. का झालं. त्याला मीच जबाबदार आहे. मी कुणाला दोष देत नाही. मला असं नव्हतं करायला पाहिजे. त्यामुळे मी बोललो’, असे वक्तव्य करत अजित पवार यांनी खंत व्यक्त केली. पुढे ते असेही म्हणाले, कुटुंबासाठी माझा निर्णय चुकीचा होतं. आमचे आजी आजोबापासून आम्ही सर्व एकत्र राहतो. त्यामुळे माझ्या मनात आलं. कुटुंबा कुटुंबात जेव्हा एकमेकांच्या विरोधात उभं राहिलो तरी कोणी तरी हरणार होतं. जिंकणारं आणि हरणारे कुटुंबातीलच होते. कुटुंबातील लोकांना त्रास होत होता. त्यामुळे मी बोललो. पत्नीला उभं करायचा निर्णय पार्लमेंट्री बोर्डाने ठरवलं. आमच्याकडे चारच जागा होत्या. त्यानंतर परभणीची जागा आम्हाला सोडावी लागली. धाराशीवची जागा घेतली. पण महायुतीचे आमदार होते. राष्ट्रवादीचे नव्हते, असे म्हणत अजित पवार यांनी मोठा खुलासा केला.