मुंबई, २४ सप्टेंबर २०२३ | महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर अध्यक्षांनी सुनावणी सुरु केलीय. त्याच संदर्भात TV9 नं विधानसभेच्या अध्यक्षांकडून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, आवश्यक तेवढा वेळ घेणारच, असं नार्वेकर म्हणालेत. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी, TV9 शी बोलताना एक बाब स्पष्ट केली की, अपात्रतेच्या निकालासाठी आवश्यक तेवढा वेळ घेणार. म्हणजेच, सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर सुनावणीला अधिक वेग येऊन निकालही लवकर येऊ शकतो अशी जी चर्चा होती. त्यावर स्वत: विधानसभा अध्यक्षांनीच उत्तर दिलंय. सुनावणी आणि निकालासाठी जेवढा वेळ घ्यायचा तेवढा वेळ घेणारच आणि त्यासाठी कोणतीही संस्था रोखणार नाही, असं स्पष्टपणे राहुल नार्वेकर म्हणालेत.
शिंदेसह 16 आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभेच्या अध्यक्षांना फैसला घ्यायचा आहे. 11 मे रोजी सत्तासंघर्षाचा निकाल देताना सुप्रीम कोर्टानं प्रकरण नार्वेकरांकडे सोपवलं. मात्र, वेळकाढूपणा होत असल्याचा आरोप ठाकरे गटाचा आहे..त्यासाठीच ठाकरे गटाच्या सुनिल प्रभूंनी सुप्रीम कोर्टात पुन्हा धाव घेतली. त्यामुळं एका आठवड्यात सुनावणी घ्या, असे आदेश कोर्टानं नार्वेकरांना दिलेत. मात्र निर्णय घेताना घाई होणार नाही, कायद्यानुसारच सारंकाही होणार असं नार्वेकर म्हणालेत.