Devendra Fadnavis | राज्यातील महिला सुरक्षतेवर ठाकरे सरकारने विशेष लक्ष द्यावं : देवेंद्र फडणवीस
साकिनाका बलात्कार प्रकरणावरुन राज्यभरात मोठी खळबळ माजली आहे. यावरुन राज्य सरकारने राज्यातील महिला सुरक्षतेवर विशेष लक्ष द्यावं असं भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवरील पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दरम्यान, ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या बदल्यात भाजपनं आपल्या 12 आमदारांचं निलंबन मागे घेण्याची अट ठेवल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत भाजपचा असा कुठलाही प्रस्ताव नसल्याचं आता देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर आम्ही संघर्ष करणारी माणसं आहोत, सौदेबाजी करणारी नाही, असं खणखणीत उत्तर फडणवीस यांनी दिलंय. तसंच राज्य सरकारने राज्यातील महिला सुरक्षतेवर ठाकरे सरकारने विशेष लक्ष द्यावं असंही फडणवीस म्हणाले.
बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी भेट घेतली. त्यांनी विनंती केली की राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी. त्यावर मी त्यांना सांगितलं की आमची कोअर कमिटी, आमचे प्रदेशाध्यक्ष चर्चा करतील आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. 12 आमदारांचं निलंबन मागे घेण्याबाबत चर्चा नाही. भारतीय जनता पार्ट सौदेबाजी करत नाही. काही पत्रकारांना अलीकडच्या काळात पतंग उडवायची सवय झाली आहे. आमच्या 12 आमदारांचं निलंबन हे नियमबाह्य आहे. आम्ही त्याबाबत कोर्टात गेलो आहोत. आम्ही कोर्टातही लढाई लढू आणि बाहेरही लढू. आम्ही संघर्ष करणारी माणसं आहोत, सौदेबाजी करणारे आम्ही नाही, असं फडणवीस म्हणाले.