‘उदय सामंत कुणाचे होऊ शकत नाही, भाजपच्या वळचळणीला जाऊन…’, ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची खोचक टीका
राज्यातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल गणेशोत्सवानतंर कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुका आणि त्या निवडणुकीत असणाऱ्या उमेदवारीच्या दावेदारीवरून राजकीय वर्तुळात दावे-प्रतिदावे करण्यात येत आहे. अशातच ठाकरे गटाच्या नेत्यानं मोठा दावा केला आहे.
विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर असताना विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना नेते मंत्री उदय सामंत हे भाजपचे उमेदवार असतील, असा मोठा दावा ठाकरे गटाचे नेते आमदार राजन साळवी यांनी केला आहे. इतकंच नाहीतर उदय सामंत कोणाचे होवू शकणार नाहीत, असेही राजन साळवी म्हणाले. तर उदय सामंत हे भाजपच्या वळचळणीला जाऊन निवडणूक लढवतील, असे वक्तव्य करत राजन साळवी यांनी उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘येत्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत उदय सामंत हे भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हाचे उमेदवार असतील. उदय सामंत हे कोणाचे होऊच शकत नाही, ना शरद पवार ना उद्धव ठाकरे ना ते एकनाथ शिंदे यांचे होऊ शकतील’, असे मोठं वक्तव्य राजन साळवी यांनी केलं आहे. पुढे ते असेही म्हणाले की, उदय सामंत हे भाजपच्या वळचळणीला जाऊन भाजपसोबत ते राहतील पण २०२४ च्या निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार उदय सामंत यांना पराभूत करणार, असे वक्तव्य करत राजन साळवी यांनी मोठा विश्वास व्यक्त केला आहे.