उन्मेष पाटलांना चाळीसगावमधून उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा; सूत्रांची माहिती काय?
राज्यभरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली असून ज्याच्यात निवडून येण्याची क्षमता त्यांनाच उमेदवारी जाहीर करणार असं सांगितलं जात आहे. अशातच मोठी बातमी समोर येत आहे.
चाळीसगाव येथीस जागेवर ठाकरे गटाच्या उन्मेष पाटील यांना तिकीट देण्यात आल्याची माहिती मिळतेय. उन्मेष पाटील हे एबी फॉर्म घेऊन मुंबईवरून चाळीसगावच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, उन्मेष पाटील यांच्या नावाची पक्षाकडून लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचेही सूत्रांकडून समजतंय. भाजप पक्षाकडून जळगावमध्ये खासदार असलेल्या उन्मेष पाटील यांची उमेदवारी नाकारत त्यांच्या जागी स्मिता वाघ यांना तिकीट देण्यात आले होते. त्यानंतर उन्मेष पाटील यांनी भाजप या पक्षाला राम-राम करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटात प्रवेश केल्याचे पाहायला मिळाले होते. २०१४ साली उन्मेष पाटील हे चाळीसगावमधून आमदार म्हणून निवडून आले होते. उन्मेष पाटील जळगाव लोकसभा मतदारसंघातून २०१९ च्या निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते. एप्रिल महिन्यात उन्मेष पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना उबाठा गटात प्रवेश केला आहे.