Thane | ठाण्यातही 500 चौरस फुटांपर्यतच्या घरांना लवकरच करमाफी मिळणार : नरेश म्हस्के
मुंबई पाठोपाठ ठाणे महानगरपालिका हद्दीतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांबाबत कर माफीचा निर्णय लवकरच होणार आहे. त्यामुळे ठाणेकरांनाही लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे.
ठाणे : 1 जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा करत सर्वसामान्य मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. असाच निर्णय लवकरच ठाणे महापालिकेत घेतला जाणार असल्याची माहिती ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी दिली आहे. मुंबई पाठोपाठ ठाणे महानगरपालिका हद्दीतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांबाबत कर माफीचा निर्णय लवकरच होणार आहे. त्यामुळे ठाणेकरांनाही लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे. ठाणे महापालिकेच्या मागील महासभेत हा प्रस्ताव मंजूर झाला असून त्यावर शासन दरबारी काम सुरु आहे. याबाबत विरोधी पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करावी, विनाकारण राजकारण करू नये, असेही महापौर म्हणाले आहेत. महानगरपालिकेच्या ठरावानुसार पालिकेच्या नियमात बदल करून त्यावर मंत्री मंडळात निर्णय झाल्यानंतर तो प्रस्ताव राज्यपाल यांच्याकडे पाठवण्यात येईल. या कर माफीमुळे पालिकेच्या तिजोरीवर देखील भार पडणार आहे. मालमत्ता कर हा महापलिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असून या आर्थिक वर्षात पालिकेच्या तिजोरीत या करापोटी कोटी रुपये जमा होतात. 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना करमाफी दिली तर वर्षाकाठी पालिकेच्या तिजोरीत सुमारे 150 कोटी रुपये तूट येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या निर्णयाचा लाखो ठाणेकरांना मोठा फायदा होणार आहे. अनेक कुटुंबांवरील आर्थिक ताण यामुळे कमी होणार आहे.