मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात हसन मुश्रीफ यांना दिलासा, कारण…
VIDEO | हसन मुश्रीफ यांचा जामीन अर्ज फेटाळला तरी ईडी त्यांना अटक करु शकणार नाही, काय आहे नेमकं कारण?
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांना अखेर मुंबई सेशन्स कोर्टाकडून तूर्तास अंतरिम दिलासा मिळाल्याचे समोर आले आहे. मुंबई सेशन्स कोर्टाने आज हसन मुश्रीफ यांचा जामीन अर्ज फेटाळला असून मुश्रीफांच्या वकिलांनी मुंबई हायकोर्टात आजच्या सेशन्स कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी अंतरिम दिलासा देण्याची मागणी केली. त्यानंतर सेशन्स कोर्टाने मुश्रीफांना तीन दिवसांचा अंतरिम दिलासा दिला. मुंबई सेशन्स कोर्टाने हसन मुश्रीफ यांच्याविरोधात 14 एप्रिलपर्यंत कारवाई न करण्याचे निर्देश ईडीला दिले आहेत. हसन मुश्रीफ यांना पुढचे दोन आठवडे तरी अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी त्यांच्या वतीने वकील प्रशांत पाटील यांनी युक्तिवाद केला. तर ईडीचे वकील हितेन वेणूगावकर यांनी मुश्रीफांच्या अर्जाला विरोध केला. यानंतर त्यांच्यात युक्तिवाद झाला. यावेळी कोर्टाकडून हसन मुश्रीफ यांना याबाबतचं संरक्षण दिल्याची माहिती समोर आली आहे.