देवेंद्र फडणवीस ‘धर्मवीर 3’ ची पटकथा लिहीणार? संजय राऊत म्हणताय, खरंतर त्यांनी ‘गोलमाल’….
प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर 2’ हा चित्रपट 27 सप्टेंबरपासून थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबद्दल शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली
“जेव्हा धर्मवीर 3 येईल तेव्हा त्याची पटकथा मी लिहीन”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले. शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर २’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गुरुवारी संध्याकाळी चित्रपटाच्या ग्रँड प्रीमियर सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या वक्तव्यावर आता संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘आता धर्मवीर 2,3,4 काढतायत. ते काय अमर, अकबर, अँथनी सिनेमा काढतायत का? खरंतर गोलमाल 1, गोलमाल 2, गोलमाल 3 असे चित्रपट यांच्यावर काढले पाहिजेत, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. पुढे राऊत असेही म्हणाले, आम्ही स्वत: आता सिनेमा काढतोय. फडणवीस धर्मवीर 3 काढतायत. त्यांना काय हो धर्मवीर माहिती? त्यांनी औरंगजेबावर सिनेमा काढला पाहिजे. महाराष्ट्र लुटायला जे नवीन औरंगजेब, अफजल खान येतायत, दिल्ली आणि गुजरातवरून.. त्यांनी त्यांच्यावरून सिनेमा काढला तर नक्कीच त्याची चर्चा होईल’, अशी उपरोधिक टीकादेखील संजय राऊतांनी केली आहे.