… पण मुख्यमंत्री असताना मी काही करु शकलो नाही, उद्धव ठाकरे आझाद मैदानावर काय म्हणाले?
आझाद मैदानावर अंगणाडी सेविकांचं आंदोलन सुरु आहे. या अंगणवाडी सेविकांच्या भेटीला उद्धव ठाकरे आझाद मैदानावर दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी अंगणवाडी सेविकांशी संवाद साधला. '...पण मुख्यमंत्री असताना मी काही करु शकलो नाही. त्यांनी मला सांगितलं की, उद्धवजी तुमच्याबद्दल आमच्या मनात प्रश्न नाही. तुम्ही ज्या काळात मुख्यमंत्री होता त्या काळात पूर्ण जग कोरोनाचा सामना करत होतं'
मुंबई, ३ जानेवारी २०२४ : आझाद मैदानावर अंगणाडी सेविकांचं आंदोलन सुरु आहे. या अंगणवाडी सेविकांच्या भेटीला उद्धव ठाकरे आझाद मैदानावर दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी अंगणवाडी सेविकांशी संवाद साधला. “मला एका गोष्टीचं नाही म्हटलं तरी खेद आहेच, कारण मधल्या काळात मी मुख्यमंत्री होतो, काल पाटील साहेब आले, रानडे साहेब आले, त्यांनी मला आजचं आमंत्रण दिलं. त्यांना मी म्हटलं की, मी काय म्हणून तुमच्याकडे येऊ? मी मुख्यमंत्री होतो ना? पण मुख्यमंत्री असताना मी काही करु शकलो नाही. त्यांनी मला सांगितलं की, उद्धवजी तुमच्याबद्दल आमच्या मनात प्रश्न नाही. तुम्ही ज्या काळात मुख्यमंत्री होता त्या काळात पूर्ण जग कोरोनाचा सामना करत होतं. या सामन्यावेळी पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये पहिलं नाव माझं होतं. पण ते माझं नाव नव्हतं तर ते तुमचं सगळ्यांचं नाव होतं. कारण तुम्ही मेहनत करत होता. घराघरात जाऊन कोरोनाचा रुग्ण शोधून त्याची काळजी तुम्ही घेत होतात”, असे उद्धव ठाकरेंनी सांगितलं. तर प्रत्येकवेळेला आंदोलन पेटलं की, एक मंत्री तुमच्याजवळ येतो. हे अधिवेशन जाऊद्या, पुढच्या अधिवेशनाला आम्ही याचा निकाल लावतो. अरे पुढच्या अधिवेशनापर्यंत तू टिकशील का? तुझं सरकार राहील का? असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.