Uddhav Thackeray : ‘तुमच्यासारखे कार्यकर्ते तिथे मरमर करतात, पण…’; मनसे कार्यकर्ते ठाकरेंकडे येताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा
घाटकोपरमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत शिवबंधन बांधून मशाल हाती घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी संवाद साधताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
‘नुकताच विधानसभेचा निकाल लागला. तो लागल्यानंतरही तुम्ही शिवसेनेत येतायत. नुसते येत नाहीत तर जल्लोषात येताय. जे जिंकलेत त्यांच्याकडे जल्लोषच नाही. कारण त्यांना त्यांच्या विजयावर विश्वासच बसत नाहीये. तुम्ही सगळे एकत्र योग्य वेळेला आलात. कारण जिंकल्यावर सगळे येतात. हरल्यावर कोणी येत नाहीत. ज्याला पराभवाची खंत असते तोच इतिहास घडवतो. आपल्याला इतिहास घडवायचा आहे’, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले, त्यांनी संपूर्ण मुंबई बरबटून टाकली आहे म्हणत आहेत एक है तो सेफ है. आता हाच प्रश्न मला मराठी माणसाला विचारायचा आहे. उद्याची मुंबई आपली राहणार आहे का? कारण असे बरेच गृहनिर्माण प्रकल्प आहेत जिथे आपली हक्काची मुंबई आपल्या डोळ्यांदेखत ओरबाडून नेली जाते आहे आणि अशा वेळी आपण षंढ म्हणून हे बघत बसणार का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. तर तुम्ही कुठल्या पक्षातून आलात त्याबद्दल मला काही बोलायचं नाही. पण पक्ष स्थापन केल्यानंतर एक काहीतरी हेतू लागतो, दिशा लागते. ती अजिबातच त्या पक्षात नाही. अशावेळी तुमच्यासारखे कार्यकर्ते तिथे मरमर मेहनत करतात, त्या मेहनतीला काही अर्थ राहात नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मनसे पक्षावर बोट ठेवत राज ठाकरेंवर निशाणा साधला. आज तुम्ही सगळे शिवसेनेत आला आहात, शिवसेनाच कारण मी शिवसेना एकच मानतो. शिवसेना हे नाव इतर कुणालाही देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. फक्त आपली निशाणी बदलली आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.