संजय राऊत पुन्हा जेलमध्ये जाणार? काय केला नारायण राणे यांनी दावा?
'माझ्या सारख्या असंख्य शिवसैनिकांचा हा त्याग आहे. पण आताचे हे शिवसैनिक आयत्या बिळावर नागोबा आहेत. शिवसेना मोठी करण्यात माझं योगदान आहे.', असं का म्हणाले नारायण राणे?
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि खासदार संजय राऊत यांच्यातील तू-तू, मै-मै कायम सुरूच असते. अशातच पुन्हा एकदा नारायण राणे यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. संजय राऊत यांची आता बाहेर राहण्याची पात्रता नाही, संजय राऊत आता जेलमध्येच…असे म्हणत नारायण राणेंनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी इतकी हेराफेरी केली आहे त्यामुळे ते पुन्हा जेलमध्ये जाणार असल्याचे भाष्य नारायण राणे यांनी केले आहे.
सध्याच्या शिवसेनेबद्दल बोलताना ते म्हणाले, काय झाली आहे शिवसेनेची अवस्था. या शिवसेनेला गावा-गावात पोहोचवणारे आम्ही आहोत. आता तसे शिवसैनिक राहिले नाहीत. त्यावेळी कोणाच्या अंगावर केसेस नव्हत्या, आम्ही वाचलो ते आमच्या आई-वडिलांच्या पुण्याईने आणि देवदेवतांच्या आशीर्वादामुळे… आता शिवसेनेचे ४० आमदार दिवसा-ढवळ्या निघून जातात आणि हे उघड्या डोळ्यांनी पाहणारे शिवसैनिक आहेत. काय झाली आहे शिवसेनेची आवस्था असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त करत निशाणा साधला.