हा माझा गुन्हा आहे का? मनसे सोडताना फायरब्रँड नेते वसंत मोरे यांचे डोळे पाणावले
वसंत मोरे यांनी आज फेसबुकवर एक पोस्ट टाकून सर्व खदखद व्यक्त केली. यानंतर यांनी पत्रकारपरिषद घेतली आणि राजीनाम्यावर सविस्तर भाष्य केले. ते म्हणाले, पुण्यातील लोकसभेसंदर्भात बोलण्यासाठी राज ठाकरे यांच्याकडेही वेळ मागितली होती. पण राज ठाकरे सुद्धा मला बोलले नाहीत....
पुणे, १२ मार्च २०२४ : मनसेचे पुण्यातील बडे नेते वसंत मोरे यांनी आज पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. वसंत मोरे यांनी आज फेसबुकवर एक पोस्ट टाकून सर्व खदखद व्यक्त केली. यानंतर यांनी पत्रकारपरिषद घेतली आणि राजीनाम्यावर सविस्तर भाष्य केले. ते म्हणाले, पुण्यातील लोकसभेसंदर्भात बोलण्यासाठी राज ठाकरे यांच्याकडेही वेळ मागितली होती. पण राज ठाकरे सुद्धा मला बोलले नाहीत. मला वाटतं अशा पद्धतीने पुणे शहरात राजकारण होणार असेल तर अशा लोकांमध्ये न राहिलेलं बरं. माझा वाद आजपर्यंत राज ठाकरे आणि मनसे सोबत नव्हता. पण ज्या चुकीच्या लोकांच्या हातात पुणे शहरात पक्ष दिला. मी काल रात्रभर झोपलो नाही. पण इतकं सर्व कुणी मला काल का विचारलं नाही? मला आज का फोन करत आहात? निवडणूक लढवणं हा माझा गुन्हा आहे का? पक्ष संघटना वाढवण्यासाठी निवडणूक लढवली पाहिजे”, असं वसंत मोरे म्हणाले आणि त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. पुढे ते असेही म्हणाले, संघटनेच्या अनेक लोकांचे फोन आले. मी सामान्य कार्यकर्त्यांचे फोन घेतले. पण मी कोणत्याही नेत्याचा फोन घेतला नाही. कारण मी या सगळ्या गोष्टी वारंवार नेत्यांपर्यंत पोहोचवल्या. पण नेत्यांना या गोष्टी का कळत नाहीयत? तुम्ही आता का मला फोन करताय? माझी तडफड एवढ्या दिवसांत तुम्हाला कळली नाही का? वसंत मोरे स्वत:साठी कधीच लढला नाही. सामान्य पदाधिकाऱ्यांसोबत रडत आला आहे. जी लोकं माझ्यासोबत काम करत आहेत त्यांना दाबण्याचा प्रयत्न होत आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले.