पालकमंत्री गुलाबराव पाटील हरवले हो, गेले कुठे? कुणी लावले गावा-गावांत पोस्टर्स?
VIDEO | पालकमंत्री हरवले हो...., ठाकरे गटाने नाही तर मग कुणी लावले पोस्टर्स? शोधून देणाऱ्यास इतक्या रुपयांचा इनाम
बुलढाणा : राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि बुलढाण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातच उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे गुलाबराव पाटील यांच्यावर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागले असताना आता दुसरीकडे बुलढाण्यात गावा-गावात गुलाबराव पाटील यांच्या विरोधात पोस्टर्स झळकले आहेत. गुलाबराव पाटील हरवले आहेत, पालकमंत्री गेले कुठे? असं या पोस्टर्सवर लिहिलं आहे. पोस्टर्स लावणाऱ्यांनी गुलाबरावांच्या विरोधात आंदोलनही केलं आहे. विशेष म्हणजे हे पोस्टर्स ठाकरे गटाकडून लावले नसल्याने अजूनच प्रश्न उपस्थित केले जात आहे. मंत्री गुलाबराव पाटील हे जळगाव आणि बुलढाणा या दोन जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ते बुलढाण्यात फिरकलेच नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. त्यामुळेच स्वाभिमानी शेतकरी संघटनांनी बुलढाण्यातील गावागावात पालकमंत्री बेपत्ता झाल्याचे पोस्टर्स लावले आहेत. शोधून देणाऱ्यांना ५१ हजार रूपयांचा इनामही जाहीर केले आहेत. त्यामुळे सध्या या पोस्टर्सची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.