तर सर्वोच्च न्यायालयात जाणार, तिथेही आमच्यासाठी दरवाजे उघडे आहेत : विनायक राऊत
निवडणूक आयोगातील धनुष्यबाण चिन्हाचा निकाल आमच्या बाजूने लागणार, विनायक राऊत यांनी व्यक्त केला विश्वास
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यातील खासदारांची सह्याद्रीवर बैठक घेणार आहेत. पण या बैठकीला ठाकरे गटाचे खासदार जाणार नसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनी संसदेच्या आधिवेशनापूर्वी प्रथेप्रमाणे घेण्यात येणाऱ्या खासदारांच्या बैठकीची चेष्ठा चालवली आहे. या परंपरेला मुख्यमंत्र्यांनी काळीमा फासला आहे, त्यामुळे आजच्या खासदारांच्या बैठकीला आम्ही खासदार जाणार नाहीत, असे विनायक राऊत यांनी म्हटले आहे. हा सगळा फार्स आहे ही बैठक यापूर्वीच नियोजित केली होती मात्र कुठल्या कारणास्तवती रद्द केली. हे सुद्धा आम्हाला सांगण्यात आलं नाही आणि आज संध्याकाळी साडेपाच वाजता ही बैठक ठेवली आहे. दिल्लीला उद्यापासून अर्थसंकल्प सुरू होत आहे. संसदेचे आणि त्यामुळे तिथे जाणे जास्त गरजेचे असल्याने आम्ही या बैठकीत उपस्थित राहणार नाही.
निवडणूक आयोग आज शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर निकाल देण्याची शक्यता आहे. यावर बोलताना विनायक राऊत म्हणाले, मला शंभर टक्के आत्मविश्वास आहे की, निकाल आमच्या बाजूने लागेल आम्ही कागदपत्रांची सगळी पूर्तता केलेली आहे. पुरावे दिलेले आहेत. त्या आधारावर जर निर्णय झाला तर आमच्या बाजूने निकाल लागेल हा आम्हाला विश्वास आहे. जर आमच्या बाजूने निकाल लागला नाही, न्याय मिळाला नाही तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ. तिथेही आमच्यासाठी दरवाजे उघडे आहेत आजचा निकाल जर आमच्या बाजूने लागला नाही तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार, असे विनायक राऊत यांनी म्हटले आहे.