Devendra Fadnavis : पश्चिम महाराष्ट्रात नुकसान कुणाला हे सर्वांनाच माहिती, देवेंद्र फडणवीस असं का म्हणालेत?
पश्चिम महाराष्ट्रात संभाजीराजेंमुळे कुणाला नुकसान होणार हे सर्वांना माहीत आहे, असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे.
नागपूर: राज्यातील वातावरण सध्या चांगलंच तापलेलं दिसतंय. संभाजी छत्रपती (sambhaji chhatrapati) यांना शिवसेनेने राज्यसभेची उमेदवारी नाकारली. यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं. शिवसेना (shivsena) आणि भाजपमध्ये या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी थेट राष्ट्रवादीलाच या प्रकरणात ओढलं आहे. संभाजी छत्रपती यांचं नेतृत्व तयार होत होतं. त्यांना मानणारा मोठा वर्ग तयार झाला आहे. त्यांच्या राजकीय उदयामुळे भाजपला कोणतंच नुकसान नव्हतं. पण पश्चिम महाराष्ट्रात संभाजीराजेंमुळे कुणाला नुकसान होणार हे सर्वांना माहीत आहे, असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. तर, श्रीमंत शाहू महाराज यांना कुणी तरी चुकीची माहिती दिली असावी. चुकीची माहिती पुरवणाऱ्यांनी संभाजी छत्रपती आणि श्रीमंत शाहू महाराज यांच्यात अंतर आहे, असं भासवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला.