विधानसभा निवडणुकीसाठी २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली होती तर आज ४ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीकडून बंडाळी रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहे. अशातच मविआत देखील काही नेत्यांनी बंड केल्याचे पाहायला मिळत आहे. मोहोळमध्ये सिद्धी कदम यांची उमेदवारी कापल्याने शरद पवार गटाचे रमेश कदम हे अपक्ष म्हणून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तर इंदापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दुफळी निर्माण झालीये. विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याने जगदाळे यांनी भरणे यांना पाठिंबा दिला आहे. यासोबत रत्नागिरीमध्ये ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख उदय बनेंनी देखील उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करण्याचा निर्णय घेतलाय. राजापुरात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड हे बंडखोरीनंतर नॉट रिचेबल झाले आहेत. भोसरीमधून ठाकरे गटाचे रवी लांडगे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असताना त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला थोडासा दिलासा मिळाला आहे.