‘…नव्या संसद भवनाचं उद्घाटन कशासाठी?’, संजय राऊत यांचा नेमका सवाल काय?
VIDEO | नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर ठाकरे गटाचा बहिष्कार; संजय राऊत यांनी काय केली घोषणा
मुंबई : सेंट्रल विस्टा प्रकल्प कोरोना काळात सुद्धा देशाच्या तिजोरीवर लाखो कोटींचा भार देऊन बनवला. त्याची खरच गरज होती का? फक्त पंतप्रधानांची इच्छा आहे म्हणून अर्ध्या दिल्लीवर बुलडोझर फिरवून हा प्रकल्प उभा केला. सध्याच्या दिल्लीतील अनेक इमारतींवर उद्घाटक म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या नावाच्या पाट्या आहेत. फक्त त्या नावाच्या पाट्या उखडून नरेंद्र मोदींचं नाव यावं म्हणून हे काम केलं असेल तर देशाच्या इतिहासातून अशा प्रकारे नावे पुसली जाणार नाहीत, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. सध्याची संसद क्रांतिकारक आणि ऐतिहासिक आहे. ही इमारत अजून 100 वर्ष चालली असती. या पेक्षाही ऐतिहासिक आणि जुन्या इमारती जगात आहे. त्या उत्तमपणे चालत आहेत. तुम्ही इमारत उभारली. राष्ट्रपतींना डावलून आदिवासी महिलेला राष्ट्रपती केल्याचा ढिंढोरा पिटला. राष्ट्रपती म्हणून आदिवासी महिलेला बसवणाऱ्या सरकारने आदिवासी महिलेला का डावललं याचं उत्तर द्यावं लागेल, असंही ते म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले, संसदेच्या प्रमुख राष्ट्रपती असतात. त्या सर्वोच्च न्यायालयाच्या प्रमुख आहेत. दोन्ही सभागृहाच्या प्रमुख आहेत. त्यांना या सोहळ्यातून डावलण्याचं कारण काय? त्यांना राष्ट्रपती करताना आम्ही पहिल्यांदा आदिवासी महिलेला राष्ट्रपती बनवलं असं भाजप सांगत होते. मग नव्या संसदेचं उद्घाटन होत असताना आदिवासी महिलेची आठवण का झाली नाही? त्यामुळेच या कार्यक्रमावर आमचा बहिष्कार आहे, असं राऊत यांनी जाहीर केलं.