विधानसभेच्या निकालानंतर सत्तेची समीकरणे बदलणार?, नवाब मलिकांनंतर अजित दादांच्या नेत्याचं मोठं वक्तव्य

| Updated on: Nov 08, 2024 | 2:22 PM

कोणत्या पक्षाचे किती आमदार निवडून येतात? हे महत्वाचं असून खरं गणित विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुरु होईल. मग काही गणितं बदलतील, असं सूचक वक्तव्य नवाब मलिक यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनीदेखील केलं आहे.

Follow us on

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांसह महायुतीच्या नेत्यांकडून आपलंच सरकार सत्तेत येईल असा दावा केला जात आहे. असे असताना आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात मोठं काही तरी घडणार असल्याची चर्चाही दबक्या आवाजात सुरू असून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी नवाब मलिक यांनी एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे संपर्कात असल्याचे म्हणत निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं असे संकेत दिले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनीही एक सूचक वक्तव्य केले आहे. “विधानसभेच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाचे किती आमदार निवडून येतात? हे महत्वाचं आहे. त्यानंतर खरं गणितं सुरु होतील. निवडणुकीनंतर त्यामध्ये काही गणितं बदलतील देखील. हे मी जनरल सांगत असून कोणते संकेत नाहीत. मात्र, समजा कोणतं गणित नाही बसलं तर सरकार स्थापन करण्यासाठी काही न काही गणितं करावी तर लागतील ना? सहा प्रमुख पक्ष आहेत, दोन आणि तीन नाहीत. त्यामुळे सहा पक्षात गणित करायला भरपूर वाव आहे”, असं सूचक वक्तव्य दिलीप वळसे पाटील यांनी केलंय.