गेल्या 15 दिवसांपासून नळाला पाणी नाही, तहान भागवण्यासाठी वणवण; कुठं टंचाईच्या झळा ?
VIDEO | ऐन जून महिन्यात पाण्यासाठी नागरिकांना वणवण, काय आहे कारण?
यवतमाळ : गेल्या पंधरा दिवसांपासून यवतमाळ शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. यवतमाळ शहरातील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहे. ऐन जून महिन्यात पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. अमृतची पाईपलाईन फुटल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. हातपंपावर महिलांसह पुरुषांची मोठी गर्दी दिसत आहे. तर रोज मोलमजूरी करणाऱ्या महिलांना रात्री-अपरात्री कुपनलिकेवर पाण्यासाठी जावे लागत आहे. पाण्याच्या या परिस्थितीमुळे आता पाणी भरावं की, रोज मजूरी करावी असा प्रश्न आता नागरिकांपुढे निर्माण झाला आहे. या भागांमध्ये नळाद्वारे पाणी पोहोचवण्यासाठी जीवन प्राधिकरण विभागाने टाकलेल्या पाण्याच्या पाईपलाईनचा मोठा भाग 26 मे रोजी दत्त चौक परिसरात फुटल्याने पाईपमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले आहे. जीवन प्राधिकरण विभागाच्यावतीने दत्त चौकात फुटलेल्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम वेगाने सुरू करण्यात आले. मात्र अर्ध्या शहराचा पाणीपुरवठा पाच दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली. त्यामुळे कालावधी संपल्यानंतरही पाईपलाईन दुरुस्त झाली नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.