मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवासेनेनं उघडलं खातं, निकाल जाहीर, कोणाची बाजी?
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी युवासेना आणि अभाविपने सर्व दहा जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. तर छात्रभारतीने चार, मनसेनं एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. तर एकनाथ शिंदे गटाकडून एकही उमेदवार सिनेटच्या निवडणुकीच्या रिंगणात नव्हता.
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांचे निकाल लवकरच जाहीर होणार आहेत. सिनेट निवडणुकीच्या मतमोजणीच्या प्रक्रियेस सुरूवात झाली आहे. नुकतंच मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा पहिला निकाल जाहीर झाला असून यामध्ये ओबीसी प्रवर्गातून युवा सेनेचे मयूर पांचाळ हे विजयी झाले आहेत. सिनेट निवडणुकीत दहाच्या दहा जागा जिंकण्याचा युवासेनेचा निर्धार आहे. या 10 जागांवरील निवडणुकीसाठी एकूण 28 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. दरम्यान, आता ओबीसी प्रवर्गातून युवा सेनेचे मयूर पांचाळ हे विजयी झाल्याने त्यांनी सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवासेनेने खातं उघडलं आहे. मयूर पांचाळ यांना 5 हजार 350 मते मिळाली आहेत. मुंबई विद्यापीठाच्या 10 नोंदणीकृत पदवीधारकांच्या जागांकरिता मंगळवारी 24 सप्टेंबर 2024 रोजी मतदान पार पडले होते. याच निवडणुकीचे निकाल येण्यास सुरूवात झाली आहे. या सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाची युवासेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे आमने-सामने होते. तर ठाकरे गटाची युवासेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत थेट लढत होत आहे.