नाशिक : सध्या अवकाळी पाऊस, गारपिटीने काही भागात त्रस्त केले. याचा फटका पिकांना बसत आहे. कांदा उत्पादकाने कांद्याने उत्पादन घेतले. पण, बाजारात कांद्याला भाव नाही. त्यामुळे या कांद्याचे करायचे काय असा प्रश्न शेतकऱ्याला पडला. सततच्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतात काढून ठेवलेला कांदा पूर्ण भिजून गेला. बाजारात त्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चही निघत नव्हता. नैराश्यातून नाशिकच्या सटाणा तालुक्यातील डांगसौंदाणे येथील युवा शेतकरी योगेश सोनवणे यांनी चक्क शेतात साठवून ठेवलेल्या कांद्यावर अंत्यसंस्कार केले. ट्रॅक्टरने कांदा शेतात पसरवून नष्ट करीत विधीवत अंत्यविधी करून भावनांना मोकळी वाट करून दिली.
पोटाच्या पोरासारखा जपलेला कांदा पावसाने भिजल्याने शेतकरी अडचणीत आलेत. मायबाप सरकारने किमान शेतकऱ्यांना मदतीची हात देऊन उभे करावे. तसेच काही दिवस सक्तीची वीजबिल आणि कर्ज वसुली तूर्त थांबवून अवकाळी पावसाने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची अपेक्षा नुकसानग्रस्त शेतकरी सोनवणे यांनी व्यक्त केली.
दुसरीकडे, बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव साकर्शा येथ काल प्रचंड गारपीट, वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या भागातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पीक खराब झालीय. देऊळगाव साकर्शा येथील शेतकरी गणेश गायकवाड यांच्या 16 एकर शेतातली आंबा, चिकू, निंबू, सफरचंद बागेचे अतोनात नुकसान झाले. आंबा फळ आता काढायला आले होते.
मात्र रात्रीच्यावेळी अचानक वादळी वारा आणि गारपीट झाली. यामधे आंब्यांच्या फळाला गारपिटीचा फटका बसला. फळ खाली पडली, तर झाडावरील फळांना मार लागल्याने ती खराब झालीत. यामुळे शेतकरी गणेश गायकवाड यांचे मोठं आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे शासनाने त्यांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी गायकवाड यांनी केलीय.
फळबागा उद्धवस्त झाल्याने आता कुणाच्या दारासमोर हात पसरवावे, असा प्रश्न फळबाग उत्पादकाला पडला आहे. सरकारी मदतीकडे शेतकरी आस लावून बसले आहेत.