जळगाव : राज्यातील शेतकरी हा निसर्गाच्या लहरीपणामुळे त्रस्त आहे. शिवाय यामुळे (Kharif Season) खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातच आता (Animal husbandry) पशूसंवर्धनाचा जोड व्यवसायही अडचणीत येत आहे. केवळ राज्यातच नाहीतर सबंध देशात (Lumpy Skin) लम्पी स्कीन या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये वाढत आहे. देशात या आजारामुळे 57 हजार जनावरांचा मृत्यू झाला आहे तर सर्वाधिक जनावरे ही राजस्थानात दगावली गेलीत. तर महाराष्ट्रात 25 जनावरांचा मृत्यू झाला आहे. हा रोग संसर्गजन्य असल्याने याचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जिल्ह्याच्या ठिकाणचे आठवडी बाजार हे बंद ठेवण्याचे आदेश पशूसंवर्धन विभागाने दिले आहेत. यापूर्वी कोरोनामुळे जनावरांचे आठवडी बाजार बंद होते. आता लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात सर्वाधिक धोका हा जळगावात निर्माण झाला आहे. त्याअनुषंगाने पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या आहेत. तर लसीकरण आणि उपाययोजना एवढाच पर्याय असल्याने शेतकऱ्यांनी त्याची अंमलबजावणी करावी असा सल्ला विखे-पाटील यांनी दिला आहे. सातारा जिल्ह्यातील 1 हजार 435 जनावरांना या रोगाने ग्रासलेले आहे. तर राज्यात 25 जनावरांचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे आठवडी बाजाराबरोबरच जनावरांची वाहतूक, जत्रेच्या ठिकाणी जनावरे विक्रीसाठी आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
लम्पी स्कीनचा सर्वाधिक फटका हा राजस्थानमधील शेतकऱ्यांना बसलेला आहे. या राज्यातील 37 हजार गायी यामुळेच दगावल्या आहेत. त्यामुळे गायींना पुरण्यासाठीही जागा अपुरी पडत आहे. देशातील गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशामध्ये या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. त्यामुळे कृषी विभागाने या राज्यांसाठी वेगळ्याच मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे लसीकरण करण्याच्या सल्ला सरकारने दिला आहे. रोगाचा धोका वाढत असला तरी दूध उत्पादनावर परिणाम झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे लम्पी स्कीनचा प्रादुर्भावच होऊ नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याकरिता ज्या जनावराला या आजाराची लागण झाली आहे त्यापासून इतर जनावरे ही दूर ठेवणे गरजेचे आहेत. शिवाय जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवावा लागणार आहे, गोठ्यामध्ये कपारी नसायला पाहिजेत जेणेकरुन यामध्ये माशा, गोमाश्या बसणार नाहीत, याची काळजी शेतकऱ्यांना घ्यावी लागणार आहे. जनावरांना कोणत्याही कागदपत्राशिवाय लस दिली जाते, त्यामुळे पशूपालकांनी योग्य वेळी ही लस दिली तर धोका टळणार आहे.