नाशिक : “माझं हे ट्विट सेव्ह करुन ठेवा! अनिल देखमुख, नवाब मलिकांपाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची बारी आहे. लवकरच हा नेता मलिक, देशमुखांच्या भेटीला जाणार आहे. भाजपाचे (Mohit Kamboj) मोहित कंबोज यांच्या अशा आशयाच्या (Twitter) ट्विटने एकच खळबळ उडाली होती. शिवाय यामध्ये राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची बारी म्हणत त्यांचा रोष कुणाकडे हे आता महाराष्ट्राच्या लक्षात आले आहे. मोहित कंबोज यांनी ट्विटमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे नाव घेतले नसले तरी त्याच अनुशंगाने सर्वकाही होते. ट्विटमुळे राज्याचे राजकारण हे ढवळून निघाले होते. त्यानंतर वातावरण निवळले असतानाच (Water Resources) जलसंपदा विभागाच्या माजी मुख्य अभियंता विजय पांढरे यांच्या आरोपामुळे पुन्हा खळबळ उडाली आहे. सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार यांना नागपूर खंडपीठाने क्लिनचीट दिली असली तरी खंडपीठाने अद्यापपर्यंत ती मान्य केलेले नाही. त्यामुळे भविष्यात काहीही होऊ शकते असेच पांढरे यांनी सूचित केले आहे.
जलसंपदा विभागाच्या सिंचन प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाला असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर होता. याप्रकरणी पवार यांना क्लिनचीट मिळाल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात 10 वर्षात काहीही चौकशी झाली नाही. करवाईचे केवळ नाटक करण्यात आले, मात्र आरोपींवर अद्यापही कोणतीच कारवाई झालेली नाही. सिंचन योजनेत मोठा अपहार होऊनही कारवाई झाली नाही हे सर्व धक्कादायक असल्याचे विजय पांढरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे कंबोज पाठोपाठ आता माजी मुख्य अभियंता यांच्या आरोपामुळे अजित पवारांच्या अडचणी वाढतील का हे पहावे लागणार आहे.
ईडीने आतापर्यंत राष्ट्रवादीचे अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यावर कारवाई केली आहे. वेगवेगळ्या आरोपातून ही कारवाई करण्यात आली आहे तर दुसरीकडे खा. संजय राऊत यांच्यावरही पत्राचाळ येथील जमीन घोटाळाप्रकरणी चौकशी सुरु आहे. या तीनही घोटाळ्यापेक्षा सिंचन घोटाळ्याची व्याप्ती अधिक आहे. चितळे समितीने याबाबतीत सर्व अहवाल सादर केला आहे. नागपूर खंडपीठासमोर परमबीर सिंग यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अजित पवार यांना क्लिनचीट देण्यात आली मात्र खंडपीठाने ती अद्यापही मान्य केली नाही. पांढरेच्या या आरोपामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळणार असेच चित्र झाले आहे.
विजय पांढरे हे जलसंपदा विभागाचे माजी मुख्य अभियंता आहेत. शिवाय त्यांनीच त्या दरम्यानच्या काळात झालेल्या चौकशीसंदर्भात सवाल उपस्थित केले आहेत. सिंचन घोटाळ्यात मोठा अपहार झाला असून अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. कारवाईचे केवळ नाटक झाले असल्याचे म्हणत त्यांनी या प्रकरणाला वेगळ्या वळणावर नेले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची पुन्हा नव्याने चौकशी होणार के देखील पहावे लागणार आहे.