उत्तर महाराष्ट्र, कोकणनंतर आता नंबर कुणाचा? ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला

| Updated on: Mar 11, 2022 | 10:41 AM

उन्हाळ्याच्या तोंडावर पुन्हा अवकाळी पावसाने थैमान घालण्यास सुरवात केली आहे. गेल्या वर्षभरापासून निसर्गाच्या लहरीपणाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. यावेळी टप्प्याटप्प्याने पाऊस राज्यभर पसरत आहे. 7 मार्चपासून वातावरणात बदल झाला असून अजूनही तो कायम आहे. सुरवातीला नाशिक जिल्ह्यासह परिसरात अवकाळीने हजेरी लावली त्यानंतर कोकणात मुक्काम ठोकला तर आता मराठवाड्यात ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

उत्तर महाराष्ट्र, कोकणनंतर आता नंबर कुणाचा? ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला
मराठवाड्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने रब्बी हंगामातील पिकांना धोका निर्माण झाला आहे.
Follow us on

मुंबई : उन्हाळ्याच्या तोंडावर पुन्हा (Untimely Rain) अवकाळी पावसाने थैमान घालण्यास सुरवात केली आहे. गेल्या वर्षभरापासून निसर्गाच्या लहरीपणाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. यावेळी टप्प्याटप्प्याने पाऊस राज्यभर पसरत आहे. 7 मार्चपासून वातावरणात बदल झाला असून अजूनही तो कायम आहे. सुरवातीला (Nashik District) नाशिक जिल्ह्यासह परिसरात अवकाळीने हजेरी लावली त्यानंतर कोकणात मुक्काम ठोकला तर आता (Marathwada) मराठवाड्यात ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. यावेळी अवकाळीची अवकृपा मराठवाड्यावर नाही असे चित्र होते. पण शुक्रवारी सकाळपासूनच सूर्यदर्शनही झाले नसून औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या आहेत. तर लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत द्राक्ष बागा, कोकणात आंबा व काजू बागांचे नुकसान झाल्यानंतर मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली तर रब्बी हंगामाचा तोंडचा घास हिसकावला जाणार आहे. रब्बी हंगामीतील सर्वच पीके ही अंतिम टप्प्यात आहेत.

तीन दिवसांपासून वातावरणात बदल

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे 7 मार्चपासून राज्यात ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यामुळे खरिपात जे झाले तेच रब्बी हंगामात का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दोन दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे द्राक्ष घडाचेच नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादनावर तर परिणाम आहेच पण जो शिल्लक माल आहे त्याच्याही दर्जावर परिणाम होणार आहे.हंगामाच्या सुरवातीपासून द्राक्ष उत्पादक हे निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करीत आहेत. यानंतर कोकणात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आंबा गळ झाली आहे शिवाय काजू बागांचीही पडझड झाल्याचे चित्र आहे.

रब्बी पिकांची अवस्था काय?

यंदा पोषक वातावरण आणि मुबलक पाणी यामुळे रब्बी हंगामातील पिके बहरात आहेत. शिवाय सध्या अंतिम अवस्थेत असताना पुन्हा वातावरणात बदल झाला आहे. शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. सध्या हरभरा, ज्वारी या पिकांची काढणी कामे सुरु आहेत. तर उन्हाळी सोयाबीन फुलोऱ्यात आहे. आता जर पावसाने हजेरी लावली तर ज्वारी, गहू हे काळवंडणार आहे तर सोयाबीनची फुलगळ होण्याचा धोका आहे. अवकाळीमुळे सर्वच पिकांचे नुकसान होणार आहे. खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरुन काढण्याचा निर्धार करण्यात आला होता पण त्यास आता अवकाळीचा अडसर निर्माण होत आहे.

शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?

वातावरणाचा अंदाज घेऊनच पिकांची काढणी करावी लागणार आहे. ज्वारी, हरभरा आणि गव्हाची काढणी करुन हे पीक जर वावरात राहिले तर ते काळवंडणार आहे. त्यामुळे काढणी न केलेलीच बरी. शिवाय ज्वारीची काढणी झाली असेल तर वेळ वाया न घालवता शेतकऱ्यांनी मोडणीच्या कामाला लागणे आवश्यक आहे. अधिकची काढणी करण्यापेक्षा काढलेल्या पिकांची सुरक्षित ठिकणी साठवणूक गरजेची आहे. शिवाय पाऊस पडण्यापूर्वीच कीटकनाशकांची फवारणी करावी लागणार आहे. पावसानंतर दोन दिवस फवारणी कामे करु नयेत असा सल्ला कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या :

Photo Gallery : निसर्गाचे धुमशान, लाल-केशरी रंगांची उधळण, उन्हाळ्याच्या चाहुलीनं पळसाला बहार

दुष्काळात तेरावा: कीटनाशकांच्या फवारणीनंतर द्राक्ष बागा जळाल्या घडही सुकले, पंढरपुरात नेमकं असे का घडले?

Summer Season: उन्हाळी सोयाबीनने शेतकऱ्यांचे पारणे फिटले, खरीप हंगामाचे टेन्शन मिटले