गणेश सोळंकी, बुलढाणा : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील खामगाव शहरात (khamgaon City) शेतकऱ्यांची फसवणूक एका अंकूर कृषी केंद्रात होत असल्याचं उघडकीस आलं आहे. त्यामुळे त्या भागातील शेतकरी एकदम संतप्त झाले आहेत. बियाणे खरेदी करीत असताना प्रतीबॅग ६०० रुपये अधिक घेत असल्यामुळे कृषी अधिकारी सुध्दा काहीवेळ चक्रावले होते. त्यामुळे कृषी अधिकाऱ्यांनी (Agricultural officer) घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता, त्यामध्ये त्यांना सुध्दा तथ्य आढळले आहे. तिथं संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी त्या कृषी केंद्राचा परवाना निलंबित करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे इतर कृषी केंद्र चालक सुध्दा घाबरले असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे.
खामगाव शहरातील अंकूर कृषी केंद्रात शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार काल एका शेतकऱ्याने उजेडात आणला आहे. त्यामुळे सगळे शेतकरी संतप्त झाले आहेत. बियाणांसाठी शेतकऱ्यांकडून प्रतीबॅग ३६०० रुपयांऐवजी ६०० रुपये अतिरिक्त आणि हमालीची किंमत अधिक घेतली जात असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकारामुळे संतप्त शेतकऱ्यांनी संबंधित कृषी केंद्रावर धडक दिली. संतप्त शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक होण्यापूर्वीच कृषी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
तक्रारदार शेतकरी पिंटू लोखडकार यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने कृषी विभागाने तिथं पोहोचल्यानंतर शहानिशा केली. शेतकऱ्यांच्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याने संबंधित कृषी केंद्र आणि गोदामातील बियाणांच्या साठ्याची मोजणी करून त्यावर कारवाई सुरू केली आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कृषी विभागाकडून संबंधित कृषी केंद्राच्या अखत्यारितील गोदामाचीही तपासणी करण्यात आली. यावेळी तात्काळ परवाना निलंबित करण्याची मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे. तर परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बुलढाणा यांच्याकडे कृषी केंद्राचा परवाना निलंबित करण्याची शिफारस करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांनी दिली.