नाशिक : नाशिक (nashik) जिल्ह्यातील खामखेडा (jamkheda) येथील शेतकरी समाधान आहेर यांनी दोन एकरमध्ये दोन लाख रुपये खर्च करून टोमॅटोची लागवड (tomato crop) केली होती. मात्र सुरुवातीला दीडशे रुपयेपर्यंत बाजारभाव मिळाला. पाहिल्या दुसऱ्या तोड्यालाच चाळीस ते पन्नास रुपये बाजार भाव मिळू लागल्याने उद्विग्न होत आहेर यांनी टोमॅटो पिकात मेंढ्या तसेच जनावरांना चारावयास सोडून दिले. वाढत्या तापमानामुळे फळे लवकर परिपक्व होत असल्याने आवक वाढत आहे. मागणी कमी व परराज्यातील व्यापारी कमी असल्याने बाजारभाव गडगडल्याने टोमॅटो तोडून विकण्यासाठी देखील घरातून पैसा जात असल्याचे शेतकऱ्याने सांगितले आहे. समाधान आहेर यांनी आज आपल्या दोन एकर क्षेत्रावर टोमॅटो खाण्यासाठी मेंढ्या सोडल्या आहेत. कांद्यानंतर आता टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. टोमॅटोला सध्या मातीमोल दर मिळत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आलाय. तोडणी केलेला माल बाजारात घेऊन जाण्यासाठी सुद्धा परवडत नसल्याने शेतकऱ्याने उद्विग्न होऊन टोमॅटोच्या उभ्या पिकात मेंढ्या चरायला सोडल्या आहेत.
कांद्याच्या भावात होत असलेल्या घसरणीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नाशिक जिल्ह्यात नाफेडमार्फत कांदा खरेदीला सुरवात करण्यात आली असून देवळ्याच्या उमराणे बाजार समितीत सायंकाळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या हस्ते औपचारिकरित्या कांदा खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कांद्याला प्रति क्विंटल 1156 रुपये इतका भाव मिळाल आहे. उद्यापासून जिल्ह्यात 14 फेडरेशन आणि नोंदणीकृत फार्मर प्रोड्यूसर कंपन्यांमार्फत कांदा खरेदी केली जाईल, शिवाय नाशिक प्रमाणे पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, अहमदनगर या जिल्ह्यांतही प्रत्यक्ष कांदा खरेदी केला जाणार असल्याचे मंत्री भारती पवार यांनी सांगितले.
कांद्यासह शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतप्त भावना आहे.आता नाशिक जिल्ह्यात गावा गावात राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचे लोण पसरू लागलेले असून, नाशिकच्या देवळा तालुक्यातील दहिवड व रामनगर गावातही संतप्त ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी तातडीची ग्रामसभा घेत गावबंदी करण्याचा ठराव केला. विशेष म्हणजे ग्रामस्थांच्या उपस्थितीत गावबंदी फलकाचे अनावरणही करण्यात आले. यावेळी शासनाच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शेतमालाला हंगामीभाव द्यावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात अशी आग्रही मागणीही शेतकऱ्यांनी केली.