धुळे : धुळे (Dhule) जिल्ह्यातील शिरपूर (shirpur) तालुक्यात राहणाऱ्या हिंगोणी येथील कुंदन पाटील (kundan patil farmer) या तरूण शेतकऱ्याने विलायची केळी लागवड केली. त्याने अडीच एकरामध्ये तब्बल 15 लाख रुपयांचा नफा मिळवल्यामुळे त्याची सर्वत्र चर्चा आहे. विलायची केळीचं पीक हे प्रामुख्याने आंध्रप्रदेश भागामध्ये घेतलं जातं. मात्र त्या भागामध्ये यार्षी लागवड कमी झालेली आहे. कुंदन पाटील या तरुणाने युट्यूबच्या माध्यमातून केळी लागवडीचं तंत्र अवगत केलं. त्यामुळे गेल्यावर्षी या केळीची लागवड केली.
विलायची केळी आकाराने लहान मात्र खायला गोड आणि चवदार असते. त्यामुळे या केळीला मोठ्या शहरांमध्ये प्रचंड मागणी असते. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने या केळीला दरही चांगला मिळत आहे. यावर्षी कुंदन पाटील या तरुणाला अडीच एकर क्षेत्रामध्ये लावलेल्या 3000 झाडांचे तब्बल 15 लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. केळीची पहिली तोडणी झाली असून, या पहिल्या तोडणीला 4800 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळालेला आहे. त्यामुळे एक वेगळा प्रयोग करून कुंदन पाटील यांनी लाखो रुपयांचं उत्पन्न काढलं आहे. अन्य तरुण शेतकऱ्यांनीही अशाच पद्धतीने शेतात प्रयोग करून उत्पन्न वाढवावे असं आवाहन शेतकऱ्यांना कुंदन पाटील या तरुणाने केले आहे.
शेतकऱ्यांच्या हातातून खरीप हंगाम गेला, त्यामुळे रब्बी हंगामावर शेतकऱ्यांची अपेक्षा लागून आहे. मात्र शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणी सापडला आहे. तर दुष्काळात तेरावा महिना अशी गत शेतकऱ्यांसमोर झाली आहे. शेतीमालाला भाव मिळत नाही आहे, मात्र शेतीला लागणारे बियाण्यांचे भाव चांगलेच वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. रब्बी हंगामाला पोषक वातावरण मिळत असल्याने रब्बी हंगामातील गहू, हरभरा चांगले येणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या पिकांवर कुठलाही रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी फवारणी करणे गरजेचे असतं, मात्र खतांच्या किमती वाढल्या असल्याने शेतकऱ्यांसाठी मोठं आर्थिक संकट समोर उभा राहिला आहे. त्यामुळे शासनाने खतांचे किमती कमी करावा अशी मागणी आता शेतकरी वर्गकडून केली जात आहे.