शाहिद पठाण, गोंदिया : बियाणे व खतांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी कंट्रोल रूमची (CONTROL ROOM) स्थापना करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी फसवणुकीची तक्रार नोंदवावी असं आवाहन कृषी अधीक्षकांनी (Superintendent of Agriculture) केले आहे. मागच्या पंधरा दिवसात महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक जिल्ह्यात बनावट बियाणे आणि बियाणे किमतीपेक्षा महाग विकले जात असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. कृषी विभागाने अशा कृषी केंद्र चालकांवरती कारवाई सुध्दा केली आहे. गोंदिया (gondia latest news) जिल्ह्यात खरीप हंगामात गुणवत्तापूर्ण बियाणे, खतांच्या पुरवठा व निविष्ठांच्या काळाबाजारावर प्रतिबंधासाठी तसेच शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास शेतकऱ्यांनी थेट कंट्रोल रूम (नियंत्रण कक्ष) मध्ये तक्रार दाखल करावी, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीबाबत त्यांच्या समस्यांचे निराकरण नियंत्रण कक्षात करण्यात येणार आहे. बियाणे, खते व कीटकनाशकांची खरेदी करताना शेतकऱ्यांना विविध अडचणी येतात. या अडचणी सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. नियंत्रण कक्षात शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिकिंगबाबत असलेल्या प्रत्येक तक्रारीचे निवारण करण्यात येणार आहे. जादा दराने खताची विक्री होत असल्यास बियाणे, खते खरेदीचे बिल मिळत नसल्यास शेतकऱ्यांनी आपल्या नावासह व संपूर्ण पत्ता, तक्रारीचे स्वरूप यांची माहिती देऊन निवारण कक्षात तक्रार नोंदविता येईल. नियंत्रण कक्ष 15 ऑगस्टपर्यंत दररोज सकाळी 8 ते सायंकाळी 8 या वेळेत सुरू राहील. शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निराकरण करण्यात येईल, असे कृषी विभागाने कळविले आहे.
मागच्या काही दिवसांपासून गुजरात आणि इतर परराज्यातून महाराष्ट्रात बनावट बियाणे येत असल्याच्या अनेक तक्रारी पोलिस आणि कृषी अधिकाऱ्यांकडे दाखल झाल्या आहेत. काही कृषी केंद्रावर विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. काही ठिकाणी रस्त्यात पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतले आहेत. हे सगळं भयंकर असल्यामुळे कृषी विभागाकडून कंट्रोल रुमची स्थापना केली आहे.