वर्धा : (Heavy Rain) अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरिप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. खरिपातील सर्व पिके ही पाण्यात आहेत. अशा परस्थितीमध्ये (Ajit Pawar) विरोधी पक्षनेते अजित पवार हे विदर्भातील पिकांची पाहणी करीत आहे. (State Government) सरकारकडून अधिकची मदत रक्कम शेतकऱ्यांना मिळवून देण्याासाठी आणि बांधावरची स्थिती काय आहे हे सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी ते विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. दोन दिवसांच्या पाहणीनंतर त्यांनी शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. एवढेच नाहीतर वेळप्रसंगी नियम-अटी बाजूला सारुन शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे. शेत शिवरातले चित्र हे विदारक आहे. त्यामुळे नियमित वेळेत पंचनामे झाले तरच नुकसानीची दाहकता लक्षात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे पंचनामे आणि मदत ही त्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्या लांबणीवर पडलेल्या आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरण्या झाल्या मात्र, अधिकच्या पावसाने पिकांचे नुकसान झाले असून आता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी कालावधीत येणाऱ्या बियाणांची निवड करणे गरजेचे आहे. बाजारपेठेत कमी कालावधी उत्पादन पदरी पड़ेल असेही बियाणे असते. त्यामुळे त्याचा वापर शेतकऱ्यांनी करावा असा सल्ला अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. पहिल्या पेऱ्यातील पिकांचे नुकसान झाले असल्याने आता अधिकचा वेळ आणि पैसा खर्चून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे नुकसानभरपाईबाबत त्वरीत निर्णय घ्यावा अशी मागणीही त्यांनी सरकारकडे केली आहे.
पीक पाहणी, पंचनामे यांची औपचारिकता न करता नुकसानीची दाहकता लक्षात घेता सरसकट मदत मिळणे गरजेचे आहे. शिवाय वेळेपूर्वी पंचनामे झाले तरच नुकसानीचे चित्र समोर येणार आहे. पंचनाम्यास उशिर झाल्यावर त्या प्रक्रियेचा तरी काय उपयोग असा सवाल पवार यांनी उपस्थित केला आहे. शिवाय ज्या शेतकऱ्यांनाचे 5 एक्करपर्यंतचे क्षेत्र त्यांनाच मदत असा नियम आहे. मात्र, मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांकडे क्षेत्र हे अधिकचे असते त्यामुळे कोणतेही नियम न लावता सरसकट मदत गरजेची असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
सरकार स्थापन होऊन एक महिना झाला आहे. असे असतानाही खात्यानिहाय मंत्री नाही. त्यामुळे कामात अनियमितता होत आहे. अधिकारी सांगतील तेच ग्राह्य धरले जात आहे. त्यामुळे बांधावरची स्थिती लक्षात येणार नाही. पालकमंत्री यांच्याकडून आढावा घेऊन मदत करणे सोपे झाले असते पण या दोघांनाच सरकार चालवायचे आहे असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर टिका केली. शिवाय लवकर शेतकऱ्यांना मदत मिळेल अशी अपेक्षाही व्यक्त केली.