महेश मुंजेवार, वर्धा : शेतातील पिकांवर औषध फवारणीचं काम तसं त्रासदायकच.. आता तर मजुरांच्या कमतरतेन ही कामं अधिकच कठीण झालीत. यातच नवनवीन तंत्रज्ञान विकसित होतंय. आर्थिक परिस्थितीमुळं शेतकऱ्यांना महागडी उपकरण घेणही शक्य होत नाही. अशात हिंगणघाट इथल्या राम कावळे या कला शाखेत द्वितीय वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थ्यानं शेती फवारणीसाठी उपयोगी ठरणारा ड्रोन बनवलाय.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या राम सतीश कावळे या विद्यार्थ्यानं शेतीउपयोगी फवारणीसाठी बनवलेला ड्रोन सर्वांच्या आकर्षणाचा ठरतोय. राम कावळे यानं समुद्रपूरच्या विद्याविकास कनिष्ठ महाविद्यालयात ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजीचा व्यावसायिक कोर्स केला.
यातून त्याला टेक्नॉलॉजीच ज्ञान मिळालं. याच ज्ञानाचा उपयोग करून त्यानं महाविद्यालयात बीएच शिक्षण घेताना ड्रोन बनवलाय. लग्नसमारंभात वापरल्या जाणारे ड्रोन पाहून त्यानं स्वतःही ड्रोन तयार करण्याचा संकल्प केला. घरी टेक्नॉलॉजीचा फारसा कुणाला गंध नसताना त्यानं स्वतःच अभ्यास करुन शेतात फवारणीस उपयोगी ठरणारा ड्रोन बनवला.
सर्वसाधारण कुटुंबातील राम कावळे यानं आजोबाच्या व नातेवाईकाच्या मदतीन सुटे भाग बोलावले. दहा लीटर क्षमतेची टाकी आहे. शेताच्या चारही बाजूंची कमांड दिल्यावर हा ड्रोन अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात एक एकर फवारणी करतो. हा ड्रोन तयार करण्यास जवळपास चार लाख रुपये खर्च आला.
सुटेभाग लवकर उपलब्ध झाल्यास लवकर ड्रोन तयार करू शकतो. या ड्रोनची किंमत कमी असल्याच तो सांगतो. आणखी कमीत कमी किंमतीत ड्रोन तयार करण्यासोबतच त्यात आणखी संशोधन करत असल्याचं राम सांगतो.
राम कावळे यानं बनवलेल्या ड्रोनच कौतुकच आहे. शेतीला याची गरज आहे. ही टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांपर्यंत पोहचली पाहिजे. रामला याकरिता आवश्यक मदत करू, असं आमदार समीर कुणावार म्हणाले.
शेतीच काम कष्टाचंच. शेतीत विविध संशोधन होत आहे. कृषी क्षेत्रामध्ये स्वयंचलित ड्रोनचाही उपयोगाची गरज आहे. त्यात राम कावळे या विद्यार्थ्यानं ड्रोन तयार करत त्यात अधिक संशोधन करण्याची तयार चालवली. सरकारनं अनुदान दिल्यास आणि संशोधनास वाव दिल्यास निश्चितच शेतकऱ्यांना कमी किमतीत ड्रोन उपलब्ध होण्यास मदत होईल.