सोलापूर : (Change Climate) वातावरणातील बदलामुळे फळांच्या दरात कमालीची घट झाली आहे. (Seasonable Fruit) कलिंगड, खरबूज या हंगामी फळांची बाजारपेठेत आवक वाढत आहे. असे असले तरी हंगामाची सुरवात दणक्यात झाली पण आता या फळांच्या मागणीत घट झाली आहे. यातच मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीमुळे तर शुक्रवारी (Solapur) सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या दोन फळांचे तर लिलावच झाले नाहीत. केवळ जांभूळ आणि डाळिंबालाच अधिकची मागणी होती. लिलावच झाले नसल्याने उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकरी एक ना अनेक प्रयोग करीत आहे. मात्र, निसर्गाचा लहरीपणा आणि बाजारपेठेतील दर यामुळे न भरुन निघणारे नुकसान होत आहे.
कलिंगड या हंगामी पिकातून चार पैसे पदरात पडतील म्हणून शेतकऱ्यांनी अडीच महिने जोपासना आणि औषधांवर हजारोचा खर्च केला. शिवाय यंदा बाजारपेठा खुल्या असल्याने अधिकचा दर मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. हंगामाच्या सुरवातीला कलिंगडला प्रति किलो 15 रुपये असा दरही मिळाला मात्र, वातावरणात बदल, वाढलेली आवक आणि आंबा बाजारात येताच कलिंगडचे दर गडगडण्यास सुरवात झाली. किलोवर विकले जाणारे कलिंगड आता नगावर विक्री होत आहे.
पहाटेपासून आवक झालेल्या शेतीमालाची येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 पर्यंत लिलाव होतात. व्यापाऱ्यांकडून मागणी होते व किरकोळ विक्रेत्ये फळे, भाजीपाला घेऊन विकतात. मात्र, मोठ्या प्रमाणात आवक होऊन देखील शुक्रावारी वातावरणातील बदलामुळे लिलावच झाले नाहीत. खरबूज, कलिंगड हे बाजारपेठेतच पडून होते. आतापर्यंत कलिंगड 100 रुपयाला क्रेट तर खरबूज 300 रुपयांना असे दर होत. पण शुक्रावारी बोलीच झाली नाही त्यामुळे उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे.
कलिंगड, खरबूजाच्या मागणीत घट असली तरी दुसरीकडे जांभूळ आणि डाळिंबाने आपले महत्व बाजारपेठेत टिकवून ठेवले आहे. यंदा डाळिंबाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे संपूर्ण हंगामात मागणी होत आहे. पिन होल बोरर या किडीमुळे डाळिंबाचे क्षेत्र घटले असून आता उत्पादीत मालाला मागणी आहे. तर जाभळाचे उत्पादन घटल्यामुळे शहरी भागात अधिकची मागणी होत आहे.