नांदेड : शेती व्यवसाय हा केवळ निसर्गावर अवलंबून आहे याचा प्रत्यय (Kharif Season) यंदाच्या खरिपातही आलेला आहे. हंगामाच्या सुरवातीला पावसाअभावी पेरण्या रखडल्या तर पेरणी होताच अधिकच्या पावसाने (Crop Damage) पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. शेतकऱ्यांनी अविरत प्रयत्न करुन पेरणीच्या टक्केवारीत वाढ केली पण अनिश्चित व अनियमित मान्सूनने सबंध खरिपाचेच गणित बिघडले आहे. आता याचा परिणाम थेट केंद्राच्या (Crop Insurance Scheme) पीकविमा योजनेवर होत आहे. आता पाऊस आणि योजनेचा सबंध काय असा सवाल तु्हाला पडला असेल पण नैसर्गिकरित्या पिकांचे नुकसान झाले तर या योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते. त्यामुळे मुदत संपण्यापुर्वी पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 6 लाख 60 हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. शिवाय उर्वरित काळात शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कृषी अधीक्षकांनी केले आहे.
राज्यात सर्वाधिक खरीप पिकांचे नुकसान हे नांदेड जिल्ह्यामध्ये झाले आहे. जिल्ह्यात सोयाबीनसह, कापूस आणि इतर पिकांचे उत्पादन घेतले जाते. मात्र, सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. यंदा पेरण्या लांबल्याने पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी वाढीव मुदत देण्यात आली होती. त्याचाच फायदा आता शेतकऱ्यांना होत आहे. पिकांचे नुकसान पाहता किमान विम्याच्या माध्यमातून तरी आर्थिक लाभ होईल ही आशा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.
पंतप्रधान पीकविमा योजना ही केंद्राच्या माध्यमातून सुरु असली तर राज्यात कृषी आणि महसूल विभागावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यंदा योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलै ही अंतिम मुदत राहणार आहे. नांदेड जिल्ह्यात 6 लाख 60 हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे तर उर्वरित काळातही असाच ओघ राहील असा विश्वास आहे. तर राज्यात 39 लाख 21 हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. 31 जुलै ही अंतिम मुदत असल्याने शेतकऱ्यांना यापूर्वीच सहभाग नोंदवावा लागणार आहे.
दरवर्षी शेतकरी हे विमा योजनेकडे पाठ फिरवत असतात. यंदा मात्र, स्थिती ही वेगळी आहे. कारण हंगामाच्या सुरवातीलाच निसर्गाच्या लहरीपणाचे स्वरुप समोर आले आहे. शिवाय अजूनही पावसाचा धोका कायम आहे. पिके पाण्यात असून जर नैसर्गिक आपत्तीमधून नुकसान झाले तर आर्थिक मदत ही मिळणार. त्यामुळे उत्पादनातून नाही किमान आर्थिक मदतीमधून तरी दिलासा मिळावा म्हणून शेतकऱ्यांचे सहभागी होण्याचे प्रमाण वाढत आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये नुकसानीच्या खुणा अधिक गडद असल्याने शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे.