लातूर : एक नाही दोन नाही तर गेल्या 15 दिवसांपासून (Kharif Season) खरीप हंगामातील मुख्य पिकाचे दर हे स्थिरावलेले होते. मात्र, याचा फारसा परिणाम आवक झाला नव्हता पण गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा दरात घसरण होऊ लागल्याने शेतकऱ्यांनी सावध पवित्रा घेतलेला आहे. हंगामाच्या सुरवातीपासूनच दर कमी झाले की (Soybean) सोयाबीनची विक्री न करता साठवणूक हा शेतकऱ्यांचा निर्णय आतापर्यंत तर कामी आला आहे. पण सध्या परस्थिती बदलत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा साठवणूकीचा घेतलेला निर्णय कितपत फायद्याचा ठरणार हे पहावे लागणार आहे. कारण गेल्या आठ दिवसांपासून महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या (Latur) लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी 25 हजार पोत्यांची आवक होत होती पण दरात घट होताच गुरुवारी ही आवक थेट 15 हजार पोत्यांवरच आली आहे. त्यामुळे पहिले पाढे पंचावन अशी काहीशी अवस्था सोयाबीनची झाली आहे.
यापूर्वी डिसेंबर महिन्यात सोयाबीनच्या दरात मोठी घट झाली होती. 6 हजार 600 वरील दर थेट 6 हजार रुपये क्विंटलवरच येऊन ठेपले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री न करता साठवणूकीवर भर दिला होता पण नववर्षाच्या सुरवातीपासूनच सोयाबीनच्या दरात वाढ होण्यास सुरवात झाली होती. त्यामुळे पुन्हा आवकवर परिणाम झाला होता. आता सोयाबीनच्या दरावरच आवक ही अवलंबून राहिलेली आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये 6 हजार 500 असलेले सोयाबीन पुन्हा 6 हजार रुपयांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे विक्रीपेक्षा साठवणूकच बरी याचा प्रत्यय आला आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल 8 हजार पोत्यांची आवक ही कमी झाली आहे.
बदलत्या परस्थितीमुळे यंदा प्रथमच उन्हाळी हंगामात सोयाबीनचा प्रयोग करण्यात आला आहे. आतापर्यंत केवळ बिजोत्पादनासाठी हा प्रयोग केला जात होता पण यंदा उत्पादनात वाढ व्हावी या दृष्टीकोनातून क्षेत्र वाढले आहे. शिवाय मूबलक पाणी आणि पोषक वातावरण यामुळे उतारही चांगला येईल असा आशावाद आहे. मात्र, उन्हाळी सोयाबीनचा हंगाम सुरु झाला तर साठवणूक केलेल्या सोयाबीनचे काय करायचे हा प्रश्न आहे, त्यामुळे टप्प्याटप्याने सोयाबीनची विक्री हेच शेतकऱ्यांच्या फायद्याचे राहणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. मंगळवारी लाल तूर- 6560 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6600 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6630 रुपये क्विंटल, जानकी चना 4760 रुपये क्विंटल, विजय चणा 4700, चना मिल 4600, सोयाबीन 6220, चमकी मूग 6900, मिल मूग 6200 तर उडीदाचा दर 6750 एवढा राहिला होता.
Banana Farming: आवक घटली मागणी वाढली, अखेर केळीच्या दरात सुधारणा झाली
ही कसली दुश्मनी ? 35 एकरातील साठवलेल्या तुरीच्या गंजीची अज्ञातांकडून होळी, लाखोंची नुकसान