जितेंद्र बैसाणे, नंदुरबार : गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमा भागात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन शेतकरी (Agriculture News) घेत आहेत. नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जात आहे, मात्र एकीकडे उत्पादन खर्च वाढला आहे. तर दुसरीकडे दरात घट होत चालली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडल्याचे चित्र आहे. त्यामुळे कांदा उत्पादक (Onion grower) शेतकऱ्यांच्या परिस्थिती अत्यंत वाईट आहे. अनेक शेतकरी चिंताग्रस्त असून घेतलेलं कर्ज कसं फेडायचं या विचारात आहे.
“कांद्याचे महागडे बियाणे आणि रोपे त्याच्यासोबत कांदा लागवडीसाठी मजुरांची टंचाई अनेक बाबींचा सामना करत आम्ही कांद्याची लागवड करत असतो. मात्र जेव्हा आमचे कांदा काढणी होते, कांदा बाजारात जातो. तेव्हा कांद्याचे दर कसे कमी होतात अशी व्यथा शेतकरी सुनील कोळी यांनी मांडली. त्यामुळे कांदा लागवड सोडून देण्याच्या विचार नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी करत आहे.”
“महागडी औषधी खतं वाढलेली असताना, लाल कांद्यांना दोन हजार रुपये क्विंटलचा दर मिळणे अपेक्षित होते. मात्र लाल कांद्याचे आवक सुरू झाल्यानंतर कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे. लाल कांदा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत आला आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडला आहे” असं शेतकरी रवींद्र गिरासे यांनी सांगितलं.
कांद्याच्या दरा संदर्भात राज्य शासनाने ठोस भूमिका घेऊन शेतकऱ्यांना उत्पादन खर्च निघेल याची तरी हमी द्यावी. नाहीतर कांदा उत्पादक शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे.
आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव बाजार समितीत गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या बाजार भाव 480 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. कांद्याचे जास्तीजास्त बाजार भाव एक हजार रुपयांच्या आत आल्याने उत्पादन खर्च तर दूर वाहतूक आणि मजुरी निघत नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सकाळच्या सत्रात 700 वाहनातून 13 हजार 500 क्विंटल कांद्याची आवक विक्रीसाठी दाखल झाली आहे. या कांद्याला जास्तीजास्त 901 रुपये, कमीत कमी 400 रुपये तर सरासरी 650 रुपये प्रति क्विंटलला बाजार भाव मिळत आहे.